चंद्रेश्वर मंदिराचा इतिहास पूर्वीच्या काळात राजा चंद्रसेनाचे साम्राज्य चांदवड नगरीत होते. राजा चंद्रसेनानेच या मंदिराची निर्मिती केली असे जेष्ठ नागरिकांचे मत आहे. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता तो शाप निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची स्थापना करून उपासना केली . या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्राचा शाप निवारण झाला. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे , शांत प्रकाशमय शक्ती आहे त्या शक्तीला चंद्र असे म्हणतात. याच शक्तीने ईश्वर म्हणजे चंद्रेश्वर म्हणून शंकराचे दुसरे नाव चंद्रेश्वर असे आहे. हे देवालय पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठमोठया संतानी, ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केलेले आहे. इ. स . पुर्व १६०० ते १७०० च्या दरम्यान मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या धामाचा विंधवंस केला. येथे असलेली विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त (सात ) ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाध्या आजही गणेश टाक्या शेजारी आहेत. नंतर या देवालायावर काही काळ अवकळा पसरली. भ्रमंती करत करत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या धामाचा दुष्टांत झाला व शंकराची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन धामाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या धामाला नावारूपाला आणले. मंदिराचा जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्टा केली. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला परत पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी परत प्राप्त करून दिले. तीर्थक्षेत्राविषयी कथा त्रेतायुगात वनवासात असताना प्रभू रामचंद्राचे या नगरीवरून प्रयाण झाले. पुराणकालीन इतिहास असे म्हणतो कि , वनवासात प्रभू रामचंद्र भागावानही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली, त्यानुसार रोडगे करून त्याचा नैव्यद्य भगवान शंकराला द्यावा असे ठरविले. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध झाले आहे . गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे . नवलाईची गोष्ट म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही . सीतामाईने रोडगे केले होते म्हणून या मंदियाच्या शेजारील डोंगरास ३ रोडग्याचे डोंगर संबोधिले जाते. श्री चंद्रेश्वर मंदिर परिसरात आणखी एक अत्यंत जुनी व पौराणिक कथाही घडलेली आहे, असे लोकांत बाळले जात आहे. याही कथेची सत्यता हल्लीचे मुंबई मुंबई आग्रारोडच्या कडेला असलेले रेणुका मातेचे मंदिर पाहून आपणास पटू लागते. असे म्हणतात कि, प्रसिद्ध साधू व महान तपस्वी ऋषिवर्य जमदग्नी मुनी हे हि काही काळ या चंद्रेश्वराच्या डोंगरावर वास्तव्य करून होते. ऋषी जमदग्नी हे सतत आपल्या तपशर्यातच गुंग असत. त्यांची पत्नी रेणुकादेवी या त्यांची सेवा अत्यंत मानोभावनेने करीत होत्या . आपले पती जमदग्नी यांना ध्यान साधनेत मदत व्हावी म्हणून पुजेस लागणारे साहित्य व फुले वगैरे रेणुका देवीच आणुन देत असत. रेणुका मातेचा काही कालावधी गेल्यामुळे साहजिकच त्यांना जमदग्नी ऋषींना फुले नेउन देण्यास उशीर झाला. ऋषी जमदग्नी आधीच हट्टी व भयंकर क्रोधी होते. त्यांनी रेणुका मातेला जाब विचारला कि, त्यांना उशीर का झाला ? रेणुका मातेने केलेल्या स्पष्टीकरणामुळे जमदग्नी ऋषींचा क्रोध कमी न होता ते अधिकच संतापले होते व तू परपुरषाबरोबर बोललीस म्हणून तुला मी आता सांगेन ती शिक्षा भोगावीच लागेल. म्हणुन त्यांनी आपला पुत्र भगवान परशुरामास आज्ञा केली कि, तुझ्या आईने माझी फसवणुक केली आहे म्हणुन तू तिचे शीर उडवुन टाक अशी मी तुला आज्ञा करतो. पितृभक्त भगवान परशुरामाने क्षणाचाही विचार न करता आपल्या आईचे शीर एका फटक्यात उडविले, ते जिथे खाली जाऊन पडले तेथेच आज रेणुका मातेचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती म्हणजे फक्त रेणुकामातेचे शिर हे आजही तेथे पाहून गंभीर घडलेल्या प्रसंगाची साक्ष देत आहे . त्याचप्रमाणे विक्रम राज्याला ज्या शनीचा प्रकोप झाला त्याच्या परीमार्जनासाठी विक्रम राज्याने याच चंद्रेश्वर गडावर घोर तपशर्या केली. त्यावेळी भगवान शंकराने प्रसन्न होऊन विक्रम राज्याला दर्शन दिले व शनीच्या प्रकोपातून विक्रम राज्याला मुक्ती मिळाल्यावर राजा चान्द्रसेनाच्या एकुलत्या एक मुलीचा (चंद्रलेखाचा) विवाह याच मंदिरात राजा विक्रम बरोबर पार पडला. राजा विक्रम व त्याची पत्नी चंद्रकला येथूनच उज्जेनला गेल्याची नोंद आढळते. चंद्रेश्वर मंदिर एक शक्तीपीठ प्रात: काळे शिव विदुष्ठा निशी पाप विनशती, कृती जन्म माध्यान सामने सप्त जन्मने, मेरु कांचव दत्तात्रय पंचकोटा तुरुगाजम , ततफलम शिव दर्शन या श्लोकाचा अर्थ असा कि, सकाळी या चंद्रेश्वराचे दर्शन केल्यावर संपूर्ण पाप नाहीसे होते. दिवसाच्या मध्यावेळी दर्शन केल्यावर जन्म मरणाचे पाप नाहीसे होते, संध्याकाळी दर्शन केल्यावर सात जन्माचे पाप नाहीसे होते अशी फलप्राप्ती या दर्शन केल्यावर चंद्रेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन केल्याने होते. पुत्र होत नसलेया गोर गरीब व इतरही हजारोंना चंद्रेश्वराने पुत्र प्राप्ती करून दिली हि पुत्र प्राप्तीची किमया आताचे स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आजही चालू आहे. स्वामी जयदेवपुरीजी महाराजांना चंद्रेश्वराच्या शिवलिंगातुन अन्नपूर्णा देवी , भगवान दत्तात्रय , भैरवनाथ महाराजांनी अनेक वेळा साक्षात्कार दिला. ते दिवस रात्र चंद्रेश्वराच्या परिसराचा विकास करण्यासाठी झटत असून भाविक भक्तांची वेळोवेळी भरपूर मदत व मोलाचे सहकार्य लाभले आहे. चंद्रेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर मंदिराच्या आजू बाजूस मोठ मोठे हिरवेगार डोंगर असून फुलांचे बाग, झाडे , औषधी वनस्पतींची झाडे , पावसाळ्यात वाहणारे धब-धबे. त्यामुळे चंद्रेश्वर मंदिराचा परिसर रमणीय व मनमोहक असा आहे. तसेच येथे भाविकांबरोबर पर्यटक , शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी , सहली मोठ्या संख्येने येत असतात. या तीर्थ क्षेत्राचा चांगल्या प्रकारचे पर्यटन स्थळ म्हणुन मोठ्या प्रमाणात विकास व्हावा अशी अपेक्षा भाविकांकडून शासनाला व्यक्त केली जात आहे. चंद्रेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक स्थळे चंद्रेश्वर मंदिराच्या पुढे जाऊन एक जुनी ऐतिहासिक अशी टाकसाळ असून पूर्वीच्या काळात या ठिकाणाहुन सर्व कारभार होत असे. आजही त्या इमारतीच्या चारही बाजूच्या दुमजली भिंती त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्याच बरोबर टाकसाळ पासून थोडे वर जाऊन टोपी किल्ला असून त्या टोपी किल्ल्याचा बुरुज पडलेल्या अवस्थेत असून त्या ठिकाणी शिलालेख लिहिलेला आहे. त्या पासून टोपी किल्ल्यावर वर जाण्या-येण्यासाठी दोराने जावे लागते. त्यानंतर पायऱ्यांच्या सहाय्याने टोपी किल्ल्यावर जाता येते . टोपी किल्ल्यावर तले असुन त्या ठिकाणी देखील पायऱ्या आहेत. दि. ८/१/१९६६ साली स्वामी दयानंद ब्रम्हलीन झाले. श्री विद्यानंद महाराज या वेळी हरिद्वारला होते. तेथेच त्यांना दृष्टांत झाला श्री दयानंद स्वामींनी त्यांना चंद्रेश्वराची सेवा करण्याची आज्ञा दिली . त्यानुसार श्री विद्यानंद महाराजांनी गुरुआज्ञेनुसार द्वितीय चंद्रेश्वर बाबा म्हणून चंद्रेश्वराची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले. द्वितीय बाबा विद्यानंद महाराजांनी या परिसराचा कायापालट केला. श्री दयानंद स्वामींची मुख्य मंदिरासमोर भव्य समाधी उभारली . चंद्रेश्वरगुरुकुल हायस्कुल व सोबत मुलांसाठी वसतिगृह , मोफत जेवणाची व्यवस्था , गोसेवेचे कार्य व्रत मानून सेवा करून गो शाळा नावारूपाला आणली. धार्मिक कामाबरोबरच त्यांनी संस्कृतचे पाठ देऊन विद्यार्थी घडविले. गोगारीबांना अल्प खर्चात विवाह लावता यावे म्हणुन त्यांनी मंदिरात सर्व प्रकारच्या साहित्याची (भांड्यांची ) सोय केली . पूर्वीच्या काळी औरंगजेबाने नष्ट केलेली ५२ मंदिरे परत बांधण्याचा त्यांनी चंद्रेश्वरासमोर संकल्प केला. हळू हळू त्यांनी ५२ मंदिरांचे निर्माण केले. मुर्ठीची स्थापना केलि. होम हवन व आदि धार्मिक कार्यक्रम करून या मंदिरांचा जिर्णोधार केला. श्री विद्यानंदाना दुर्गादेवीने दृष्टांत दिला, मूर्तीची प्रतिस्थापना कर म्हणून सांगितले त्यानुसार देवीची मूर्ती बसवुन मंदिर बांधले. दोघाही महाराजांनी अंगावर लांगोता व्यतिरिक्त कुठलेही वस्त्र जन्मभर वापरले नाही. कार्य करता करता १००८ श्री स्वामी विद्यानंद महाराजांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंचायती आखाडा, हरद्वार , मुंबई, काशी , मथुरा येथील सुमारे २००० ते २५०० साधुसंत आले. चांदवडची जनता परत शोकसागरात बुडाली श्री विद्यानंद महाराजांची समाधी मंदिर या ठिकाणी आहे. मंदिराचे उत्तराधिकारी म्हणुन हरिद्वार येथील महंत बन्सीपुरीजी महाराज यांची निवड झाली. सध्या ते कुरुक्षेत्र येथे राहून स्वामी जयदेवपुरीजी यांच्या अधिपत्याखाली चंद्रेश्वर मंदिराचे कामकाज चालू आहे. महंत बन्सीपुरी महाराजांच्या अधिपत्याखाली सध्या महान तपस्वी , सिद्धयोगी , हनुमानाचे उपासक परम भक्त असलेले स्वामी जयदेवपुरीजी येथील कारभार देखरेख व चंद्रेश्वराची सेवा करीत आहे. चंद्रेश्वर मंदिराचा सर्व कारभार श्री. पंचायती महानिर्वाणी आखाडा , हरिद्वार यांच्या मार्फत चालतो. स्वामी जयदेवपुरीजी महाराजांनी तालुक्यातील जनतेस चंद्रेश्वरचे महान महत्व पटवून देऊन , जनतेच्या मनात त्यांनी आपुलकीचे स्थान मिळवलेले आहे. श्रावण महिन्यात संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी असते. पहाटे ४ पासूनच गडावर भाविकांची रिघ लागलेली असते. नवरात्रात सप्तशती दुर्गपुजन , राम नवमी , हनुमान जयंती , गुरुपोर्णिमा असे अनेक धार्मिक कार्यक्रमांनी चंद्रेश्वरचा परिसर गजबजलेला असतो. त्राम्बाकेश्वारला प्रत्येक कुम्भामेलाव्यात चंद्रेश्वर धामातर्फे अन्नछत्र चालविले जात असते. प्रथम व द्वितीय चंद्रेश्वर बाबांची संयुक्त पुण्यतिथीला व महाशिवरात्रीला महाराष्ट्रातून सुमारे एक लाख ते दीड लाखाच्या आसपास भाविक महाप्रसाद व भंडारयाचा लाभ घेतात. महंत बन्सीपुरीजी महाराज व स्वामी जयदेवपुरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते , भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे, या कार्यक्रमाला शिवलिंग अभिषेक , बाबांच्या समाध्यांचे पूजन, भव्य मिरवणुक व पालखीची पुजा अर्चा केली जाते. चांदवड नगरीतील प्रत्येक घरासमोर प्रतिमेची , पालखीचे पुजन केले जाते. भालेदार, चोपदार, ढोल पथक , लेझिम , भजनी मांडले , भगवे ध्वज , उंच पताका या मिरवणुकीला शाही स्वरूप प्राप्त होत असते. हर हर महादेव, चंद्रेश्वर बाबा की जय आदि गजराने परिसर दुमदुमतो. पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करणाऱ्या व ऋषी मुनीच्या तापाने , प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या या तपोभूमीचा व तिन्ही प्रहरात दर्शन केल्याने वेगवेगळी फळे देणाऱ्या या पुण्य पवन चंद्रेश्वराच्या मंदिरातच विक्रम राजाचा उद्धार झाला. अशा या चंद्रेश्वराला कोटी कोटी प्रणाम. ॐ चंद्रेश्वराय नम: स्रोत : Chandreshwar Darshan