भारतीय समाजाला सामाजिक सेवेचा मोठा वारसा आहे. दातृत्वाची फार मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी अनेकदा समाजाने व्रतस्थ भावनेने मोठे कार्य केले आहे. अनेक समाजसुधारकांनी समाजव्यवस्था समाजाभिमुख व्हावी, वंचिताना मुख्य प्रवाहात आणता यावे म्हणून प्रयत्न केले आहेत. सेवेचा हा समृद्ध वारसा अनेक पिढ्यांनी पुढे चालविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात जुने संदर्भ बदलून प्रत्येक घटकाने नवीन बदल स्वीकारले आणि समाजसेवा या क्षेत्राने देखील कात टाकली आहे. तेव्हा पारंपारिक पद्धतीने समाजसेवा केली जायची पण आता व्यावसायिक पद्धतीने समाजसेवक म्हणून काम करता येत असल्याने उदरनिर्वाहाबरोबर सेवेचा आनंद देखील मिळतो आहे. अनेक परदेशी संस्था भारतातील विकासाच्या, आरोग्याच्या, शिक्षणाच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवत आहेत. या व्यापक होत जाणाऱ्या क्षेत्रात करिअरच्या अमाप संधी आता उपलब्ध होत आहेत. देशात अनेक स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभे राहिले आहे. शासनाकडून देखील अनेक प्रकल्प सामाजिक संस्थाना दिले जात आहेत. या क्षेत्राला सध्या कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे. अर्थात समाजाला चांगल्या समाज सेवकांची गरज आहे. तर मग समाजसेवक म्हणून करिअर करताना नेमके काय करावे याचा अल्पसा घेतलेला आढावा. पात्रता बारावीनंतर तीन वर्षासाठी बीएसडब्ल्यू या पदवीसाठी प्रवेश घेता येतो. तसेच पदव्युत्तर पदवी एमएसडब्ल्यूही करता येते. काही ठिकाणी एप्रिल, मे दरम्यान प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. पदव्युत्तर पदवी करताना यामध्ये विवीध उपविषयांचा अंतर्भाव असतो. शिक्षण, कुटुंब व बालकल्याण, समाजकल्याण, नागरी आणि ग्रामीण विकास, वैद्यकिय व मानसशास्त्र, गुन्हेजगत व मजूर कल्याण आदी विषयात आवडीनुसार आपल्याला शिक्षण घेता येते. कामाच्या संधी समाजकार्यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही स्वयंसेवी संस्थेमध्ये नोकरी करता येते. आरोग्यसेवा, व्यसनमुक्ती, बालकल्याण, बाल संगोपन व त्यांची काळजी, शाळांशी निगडित समस्या आदी बाबींवर काम करता येते. तसेच समुपदेशक म्हणून स्वतंत्ररित्या काम सुरु करता येते. अनेक उद्योगामध्ये देखील सोशल वर्कर साठी जागा असतात. या क्षेत्रात शिकतानाच कामाचा अनुभव घेता येत असल्याने पुढे जाऊन त्याचा फायदा होतो. तसेच स्वत:ची स्वयंसेवी संस्था काढून शासनाचे अनेक स्वतंत्र प्रकल्प घेता येतात. प्रशिक्षण संस्था मुंबई विद्यापीठ - एमजी रोड फोर्ट मुंबई ४०००३२ द टाटा सामाजिक विज्ञान संस्था - पी-८१, लाल दत्ता मार्ग, एस आंबेडकर नगर, अणुशक्तीनगर मुंबई, महाराष्ट्र ४०००८५ कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन - ३८, न्यू मरीन लाइन्स, चर्चगेट (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००२० कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स - १८ हिल साईड कर्वे नगर पुणे ४११०५२ समाजकार्य विभाग, शिवाजी विद्यापीठ, विद्यानागर, कोल्हापूर ४१६००४ सायबर कॉलेज, विद्यापीठ रोड, कोल्हापूर ४१६००४ समाजकार्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशलवर्क, हायकोर्ट रोड, बजाज नगर, नागपूर ४४००१० स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्कूल ऑफ सोशल सायन्स नांदेड, एसआरटीएम विद्यापीठ परीसर, विष्णूपुरी , नांदेड (नांदेड जि.) ४३१६०६ भारती विद्यापीठ, अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, बिजापूर रोड सोलापूर. जागतिकीकरणामुळे मानवाचा जीवनस्तर उंचावला आहे आणि त्यानुसार त्याच्या गरजाही वाढल्या आहेत. त्याच्यातील वर्तनबदल, त्याचे भावविश्व आणि सर्वच बाबी बदलल्या आहेत. त्यामुळे सुसंवादासाठी मानवाला सोबतीची गरज भासते आहे. त्याचबरोबर सामाजिक उन्नतीचा दृष्टिकोन बाळगणारी, सामाजिक जाणिवा असणारी व्यक्ती असणे आवश्यक वाटते. व्यावसायिक समाजकार्य हे समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. अर्थात समाजसेवेची व्याप्ती व गरज दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यात आर्थिकप्राप्तीच्या संधी वाढत असल्याने तरुणांनी या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही. सेवेचे समाधान तसेच समाजात प्रतिष्ठा मिळवून देणारे हे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. चला तर मग हा सेवेचा समृद्ध वारसा आपण पुढे नेवूया. लेखक - सचिन पाटील स्त्रोत - महान्युज