राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन 2016-17) एकच सामायिक परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी होणार आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. या प्रवेशासाठी पूर्वी जेईई ५० टक्के आणि राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेतील ५० टक्के गुण मिळाले की विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत असत. परंतु शासनाचा नव्या निर्णयामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावरील आधारित ‘सीईटी’ मध्ये ५० टक्के आणि बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये ५० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. यात वैदयकीय प्रवेशासाठी जीवशास्त्रामध्ये ५० टक्के गुण असणाऱ्यांनाच आता प्रवेश मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाचे महत्त्व निश्चितच वाढले आहे. ही परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने या विद्यार्थ्यांनी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. त्यामुळे साहजिकच राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर एकच सीईटी असल्याने विद्यार्थ्यांना पर्यायांची उपलब्धता सहज सोपी झाली आहे. निर्णयाची वैशिष्ट्ये राज्यातील विविध अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी (MHT- CET) ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून घेण्यात येणार आहे. सदर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेकरिता विदयार्थी एकच प्रवेश परीक्षा अर्ज सादर करतील. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र (प्रत्येकी 50 गुण) या दोन्हींची प्रश्नपत्रिका सामाईक असेल. तर गणित (100 गुण) व जीवशास्त्र (100 गुण) या विषयांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ही राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर असेल. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता व गुणवत्ता राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेत (एमएचटी-सीईटी) प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षेतील (एमएचटी-सीईटी) गुणांच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र गुणवत्ता याद्या तयार करण्यात येतील. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित/जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल. वैदयकीय अभ्यासक्रमांसाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील विदयार्थ्यांने राज्य परीक्षा मंडळ किंवा समकक्ष मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित हे अनिवार्य आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/टेक्निकल व्होकेशनल यापैकी एक विषयात मिळून एकूण किमान 50 टक्के (मागासवर्ग व शारिरीक विकलांग विदयार्थ्यांनी किमान 45 टक्के) गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. तसेच औषधनिर्माणशास्त्र व वैदयकीय अभ्यासक्रमांसाठी संबंधीत समूचित प्राधिकरणांनी (मेडीकल काऊन्सिल ऑफ इंडिया, नर्सिंग काऊन्सिल इत्यादी सारख्या) विहित केलेल्या पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक असेल. एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णय झाला असून सदर साईटी राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही. -वर्षा फडके वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) माहिती स्त्रोत : महान्युज