जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'मी जातां राहील कार्य काय ?सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;तारे अपुला क्रम आचरतील,असेच वारे पुढे वाहतील,होईल कांहिं का अंतराय ?मेघ वर्षतील, शेतें पिकतील,गर्वानें या नद्या वाहतील,कुणा काळजी कीं न उमटतीलपुन्हा तटावर हेच पाय ?सखेसोयरे डोळे पुसतील,पुन्हा आपल्या कामी लागतील,उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,मी जातां त्यांचें काय जाय ?राम-कृष्णही आले; गेले !त्याविण जग का ओसचि पडलें ?कुणीं सदोदित सूतक धरिलें ?मग काय अटकलें मजशिवाय ?अशा जगास्तव काय कुढावें ?मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?हरिदूता कां विन्मुख व्हावें ?कां जिरवुं नये शांतींत काय ? कवी : भा. रा. तांबे