सोने किंवा मौल्यवान धातूंपासून (उदा., चांदी) दागिने, भांडी, सजावटीचे सामान, उत्सव व समारंभा-साठी लागणाऱ्या वस्तू, वास्तुशिल्पात लागणारी सजावट, मूर्ती वगैरे तयार करणाऱ्या कारागिरीस सोनारकाम असे म्हणतात. सोन्याच्या विलक्षण गुणधर्मामुळे व त्याच्या अंगभूत सौंदर्यामुळे त्याला जगातील सर्व संस्कृतींमध्ये असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. देवदेवतांच्या मूर्तिमखरापासून राजांच्या-स्त्रियांच्या अलंकार-सिंहासनापर्यंत सोन्याचा वापर झालेला असून त्यात सुवर्णकाराच्या कलाविष्काराचे गुणविशेष प्रकट होतात.

या कलावस्तूंचे मुख्यत्वे चार प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते : (१) स्त्री-पुरुषांनी वापरावयाचे व्यक्तिगत अलंकार-दागिने. यात अभिजात कालापासून ते आजपर्यंतच्या अलंकारांचा [जड सुवर्णयुक्त पिळीच्या (टॉर्क) अलंकारापासून अंगठीपर्यंतच्या सर्व जडजवाहिरांचा] अंतर्भाव होतो. (२) समारंभासाठी वापरात असणारी विविध साधने (फ्लॅट वेअर). जसे ताट, वाटी, वाडगा, चमचे, केटली, भांडी इत्यादी. (३) नाणी, पदके, तबके इत्यादी. (४) मुखवटे, शिरोभूषणे, ढाली, कट्यारी, शस्त्रास्त्रे वगैरे.

सामान्य प्रक्रिया आणि तंत्रे : आज सोनारकामात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक प्रक्रिया प्राचीन काळापासून वापरात असलेल्या आहेत. उदा., हातोड्याने केलेले काम (घडाई), उठावरेखन, चेसिंग, जडावाचे काम, वेष्टन, तारनिर्मिती, तसेच लुकण (एनॅमल), निएल्लो आणि रत्ने यांनी युक्त वस्तू तयार करणे.

हातोडीकाम व ओतकाम : सर्व तऱ्हेचे सजावटीचे सोनारकाम मूलतः हातोडीने केले जाते. वस्तूतील विविध भाग स्वतंत्र रीत्या तयार करून नंतर ते एकत्रितपणे जोडले जातात. जेव्हा डाखकामाचा शोध लागला नव्हता तेव्हा खिळमाने (रिबिट मारून) ठोकली जात अथवा घट्ट गाभ्यात ठोकली जात.

साधारणतः इ. स. पू. पंचविसाव्या शतकानंतर धातूचे हातोडीकाम आणि ओतकाम याच्या प्रमाण पद्धती समांतरपणे विकसित झाल्या. मेणाद्वारे ओतकाम करण्याची पद्धत ईजिप्तमध्ये इ. स. पू. पंचविसाव्या शतकापासून प्रचलित होती; ईजिप्तमधील कारागिरांनी ही कला बहुधा सुमेरियन कारागिरांकडून शिकली असावी. ओतकामाची पद्धती अस्तित्वात आल्यानंतर प्राचीन खिळे वा रिबिट ठोकण्याची किचकट पद्धती कमी प्रमाणात वापरण्यात येऊ लागली, मात्र मौल्यवान धातूंसाठी हातोडीकामच वापरात राहिले आहे. प्राचीन ॲसिरियन, इट्रुस्कन आणि ग्रीक सोनारांनी जे अद्वितीय काम केले आहे, ते हातोडी आणि मुद्राकारक यांचा वापर करूनच केलेले आहे.

उठावरेखन : उठावरेखन म्हणजे धातूच्या पत्र्यांच्या विरुद्ध बाजूवर रेखांकित सजावटीला उठावदारपणा आणणे. धातूच्या पृष्ठभागावर सर्वप्रथम सजावटीच्या आकाराचे रेखांकन केले जाते व अन्वेषकाद्वारे बाह्यरेषा निश्चित केली जाते. ज्यामुळे रेखाटनाची आवश्यक सजावट पाठीमागच्या पृष्ठभागावर दिसू लागते. वरचा पृष्ठभाग खाली करून अस्फाल्टाच्या (एक घट्ट व काळे द्रव्य; आशुपाल) चौकटीत वर आलेला भाग अस्फाल्टाच्या भागात हातोडीने ठोकला जातो. ही हातोडीने ठोकण्याची आणि आकार रुतविण्याची प्रक्रिया अनेकदा केली जाते. त्यानंतर सर्वात शेवटी साच्यानुसार सोन्याच्या पत्र्यांला अंतिम स्वरूप प्राप्त होते.

अनुरेखन करण्यासाठी, नक्षीदट्ट्या (उठावरेखनासाठी) आणि साचा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधनांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे काही विशेष साधनांचीही गरज असते; उदा., लवचिक दांडा. याचा वापर किचकट जागेवर जेथे सहज पोहोचणे शक्य नसते अशा ठिकाणी केला जातो. यांत्रिक पद्धतीने देखील नक्षीकामे, सजावटींच्या वस्तू बनविता येणे शक्य असते. वेगवेगळ्या साच्यात, चौकटीत किंवा मुद्रा ठशात पातळ व लवचिक पत्रा वापरून उठावरेखन करता येते. या सर्व पद्धती ग्रीक-रोमन काळापासून वापरात आहेत.

चेसिंग : पत्र्यांच्या पृष्ठभागावर ठोके व मुद्राकारक मारून चेसिंग करण्यात येते. हे मुद्राकारक किंवा छापटंक एवढे आकारबद्ध असतात की त्यांद्वारे कुठलाही परिणाम साध्य करता येऊ शकतो. उत्कीर्ण मुद्रण (धातूच्या खालच्या पृष्ठावर छेदणे) किंवा धातुकामाच्या उठावाच्या आवश्यकतेनुसार पृष्ठभागावर नक्षीकामाचे अनुरेखन केले जाते आणि लगत भागाला ठोकून उठाव आणून पार्श्वभूमी तयार केली जाते. असे चेसिंग झालेले उठावकाम कधीकधी उठावरेखनसदृश भासते. मात्र नंतरच्या प्रक्रियेत नक्षीकाम मागील बाजूने अधिक उठावदार करण्यात येते. चेसिंग झाल्यानंतर उठावरेखनाच्या कामात परिपूर्णता येते. चेसिंग ही संज्ञा हाताने छापटंक वापरून साचा कामावर अंतिम हात फिरवून काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेलाही वापरतात.

उत्कीर्णन : कठीण हत्यारांच्या तीक्ष्ण टोकाने सोने, चांदी इ. धातूंच्या पृष्ठांवर रेषांची आकृती खोदून काढणे म्हणजे उत्कीर्णन होय. हे नेहमीच कापण्याच्या हत्यारांनी हस्तदाबाद्वारे केले जाते. जेव्हा ही प्रक्रिया हातोडीने दाब देऊन केली जाते, तेव्हा तिला तक्षण म्हणतात. नाणी पाडण्याच्या मुद्रा बनविणे, सोन्या-चांदीच्या पत्र्यांवर धार्मिक प्रसंगांची चित्रे वा अन्य आकृत्या कोरणे, जडावाच्या दागिन्यावर नक्षीकाम करणे इत्यादींसाठी उत्कीर्णन तंत्राचा वापर करतात. सोने, चांदी व इतर मौल्यवान धातूंची नाणी पाडण्याच्या प्रक्रिया उत्कीर्णित मुद्रा यांत्रिक पद्धतीने करतात, परंतु उत्तमोत्तम चित्रांचे कलात्मक उत्कीर्णन साधण्यासाठी कारागीर हातानेच काम करतो.

जडावाचे काम : या अलंकार निर्मिती प्रक्रियेला दमास्कनीय म्हणतात. दमास्कस या देशातील सोनार या प्रकाराचे काम करीत असत, त्यामुळे यास हे नाव पडले आहे. सोन्याची (कधीकधी चांदी किंवा तांब्याची) तार लोखंड, पोलाद किंवा जस्ताच्या पृष्ठभागावर जडविण्याची (डकविण्याची) ही कला आहे. ज्या पृष्ठभागावर नक्षी अनुरेखित करावयाची असते, तो शेवटी अणकुचीदार हत्याराने अधःकृत्त करतात. सोन्याची तार अथवा धागा अधःकृत्त केलेल्या पृष्ठभागावर लहानशा खोबणीत सुरक्षित रीत्या हातोडीने ठोकतात.

निएल्लो प्रक्रियेत निएल्लोच्या (सिल्व्हर सल्फाइड किंवा सल्फाइडांचे मिश्रण) मदतीने कोरीव अलंकरण नक्षीकामाचे जडावकाम केले जाते. निएल्लो निर्मितीची प्रक्रिया व तिचे चांदीवर उपयोजन यासंबंधी सर्वप्रथम बाराव्या शतकात एराक्लिअस आणि थिओफिलस यांनी तसेच सोळाव्या शतकात बेनव्हेन्युटो चेल्लीनी यांनी लिहिले. या सर्व लेखकांनुसार चांदी, तांबे आणि शिसे यांचे मिश्रण सायुज्यित करून आणि नंतर ती मिश्रधातू गंधकासोबत एकत्रित करून निएल्लो तयार करतात. चांदी, तांबे आणि शिसे यांच्या सल्फाइडांचे मिश्रण काळ्या रंगाच्या भुकटी (पावडर) स्वरूपात असते. ते धातूवर कोरीवकाम झाल्यानंतर साधारणपणे चांदी चिकटविण्यासाठी मदत करणाऱ्या अभिवाहकासोबत ओलाव्यासाठी वापरतात. धातूवर थोडी भुकटी पसरवून कडकपणे ती गरम केली जाते. निएल्लो वितळून कोरीवकाम केलेल्या मार्गातून वाहते. जोपर्यंत जडावाचे कोरीवकाम उठून दिसत नाही, तोपर्यंत जादा झालेले निएल्लो खरवडून काढून टाकले जाते आणि शेवटी पृष्ठभाग घासून स्वच्छ केला जातो. पाश्चिमात्य देशांत निएल्लो प्रक्रिया वापरलेली आढळते.

मीनाकारी : (एनॅमलिंग). सोने व चांदी यांसारख्या धातु-वस्तूंच्या पृष्ठभागावर विविध रंगांचा वापर करून हिरे-माणके वापरल्याचा आभास निर्माण केला जातो. धातुपृष्ठावर लुकण भरण्याचे दोन प्रकार आहेत : (१) शालव्हे (ओतीव) : यामध्ये धातुपृष्ठावर कोरलेल्या नक्षीदार खाचांमध्ये लुकण भरतात. भारतात मुख्यत्वे या प्रकारचाच अवलंब करण्यात येतो. (२) क्लाँसोने (घडीव) : धातूच्या पृष्ठभागावर पट्ट्या चिकटवून कोश बनवून ते कोश लुकणाने भरतात.

सोन्याचे वर्खकाम व मुलामे : (गिल्डिंग). लाकूड, धातू, गिलावा (प्लास्टर) किंवा कुठलीही वस्तू सोन्याच्या वर्खाने अथवा भुकटीने सजविणे म्हणजे वर्खकाम होय. ही संज्ञा चांदी, पॅलॅडियम, ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या मिश्रधातूंवर केलेल्या कामासाठी देखील वापरली जाते. सोने आणि चांदी यांचे मुलामे शोभेकरिता, मालिन्यप्रतिकाराकरिता वा परावर्तनांक वाढविण्याकरिता वापरतात. याकरिता निमज्जन (स्थानांतर विलेपन) या पद्धतीचा वापर करतात.

प्राचीन सोनारकाम करणारे कारागीर वर्खकाम करण्यात अत्यंत निष्णात होते. प्राचीन ईजिप्तमधील शाही घराण्याच्या ममींच्या ताबूतांवर आणि लाकडीकामावर सोन्याचा मुलामा देऊन केलेली कामे तसेच प्राचीन चिनी सोन्यामधील लाकूड, मृत्पात्रे आणि वस्त्रांवरील सुंदर नक्षीकाम हे पुरावे आहेत ग्रीकांनी वर्खकामात विशेष कौशल्य प्राप्त केले होते. त्यांनी लाकूड, पाषाण व संगमरवरी शिल्पांवर वर्खकाम केलेले आहे, तसेच धातूंवर सोन्याचा पारदमेल (अमालगम) आगीत तापवून त्यावरून पारा उष्णतेने सारून (फासून) धातूच्या पृष्ठभागावर सोन्याचे आवरण देण्याची कला त्यांना साध्य होती. रोमनांनी वर्खकामाची कला ग्रीकांकडून घेतली आणि आपली मंदिरे व प्रासाद अत्युत्कृष्ट वर्खकामाने सजविली. भारतात देखील अनेक मंदिरांवर सोन्याचे वर्खकाम प्रामुख्याने दिसून येते. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, तिरुपती येथील बालाजीचे मंदिर ही प्रसिद्ध उदाहरणे होत. मुंबईचे सिद्धिविनायक तसेच शिर्डीचे साईबाबा मंदिरांवर सोन्याचे कोरीवकाम केलेले वर्खकाम आढळते.

सोन्याचा पत्रा हाताने (कधीकधी यंत्राद्वारे) ठोकून अतिशय पातळ (०·००००१ सेंमी.) केला जातो. नंतर तो चौकोनी आकारात (९·८४ सेंमी. या प्रमाणभूत मापात) बनवून टिपकागदात गुंडाळून वर्खकाम करणाऱ्या कारागिरांना वापरासाठी दिला जातो.

आपले काम अधिक सुंदर व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वर्खकाम करणारे विविध पदार्थ वापरतात. तसेच स्वतःच्या वेगवेगळ्या सुधारित पद्धतीही वापरल्या जातात. तरी देखील काही पद्धती सर्व प्रकारच्या वर्खकामासाठी समर्पक असतात. उदा., ज्या पृष्ठभागावर वर्खकाम करावयाचे आहे, तो भाग प्रायमिंगद्वारा (घासून सपाट, गुळगुळीत व एकत्रित करणे) काळजीपूर्वक तयार करून घेतात. रंग, चिकटविणारे पदार्थ व लाख (रोगण) पृष्ठभागाच्या स्वरूपानुसार वापरले जातात. ज्या धातूंची झीज होते असे धातू लाल शिसे किंवा आयर्न ऑक्साईड रंगांनी रंगवून प्राईम व संरक्षित केले जातात. पृष्ठभाग पूर्णपणे तयार आणि कोरडा झाल्यावर वर्खकाम करणारा कारागीर शिसपेन्सिल किंवा खडूने नक्षी आखतो.

वर्खकाम करावयाचा पृष्ठभाग विशिष्ट आकारात सोन्याचे वर्ख सुरक्षितपणे चिकटविण्यायोग्य बनवितात. पृष्ठभागानुरूप आकाराचे प्रमाण ठरविले जाते, तसेच सुकण्याच्या दृष्टीने (जलद किंवा हळू) विचार केला जातो. जेव्हा नक्षीचा आकार पुरेसा सुकतो (म्हणजे फक्त बोटाचे टोक थोडेसे चिकटते), तेव्हा सोन्याचा वर्ख किंवा भुकटी सुरक्षितपणे चिकटण्यायोग्य होते.

टिपकागदातून थेट इच्छित आकारावर सोन्याचा वर्ख लावता येऊ शकतो. वर्खकाम करणारा कारागीर साधारणपणे टिपकागदात गुंडाळलेला सोनेरी वर्ख आवश्यक तेवढा एखाद्या टोकदार हत्याराने (तासलेली अडकणी) काढून घेतो. नंतर तो भाग वर्खकाम टोचणीवर (उंटाच्या केसांचा पुठ्ठ्यांत बसविलेला कुंचा) घेतो आणि हळूवार नक्षीच्या भागावर लावतो. टोचणीवर सोन्याचा वर्ख स्थिर विद्युत् भारामुळे टिकून राहतो, हा भार कारागीर ब्रश आपल्या केसांत फिरवून निर्माण करतो. काही वर्ख कामांसाठी कारागीर सोन्याचा वर्ख पकडण्यासाठी उशीचा वापर करतात. ही लाकडाची उशी आयताकृती (साधारण २३ x १५ सेंमी.ची) बनविलेली असते. त्यावर लोकरीच्या मऊ कापडाची घडी गायीच्या चामड्याने आच्छादलेली असते. एका बाजूला चर्मपत्राची फळी बनविलेली असते, ज्यामुळे सोन्याचा नाजूक वर्ख वाऱ्याने उडून जात नाही. वर्खकाम पूर्ण झाल्यानंतर वर्खाने झाकलेला पृष्ठभाग उत्तम दर्जाच्या कापसाच्या थापीने थापतात. कापसाने घासल्यामुळे सोन्याची चमक अधिक वाढते. वर्खकाम करणारा कारागीर चमक आणण्यासाठी अकीकाचा खडा वापरतात. त्यामुळे धातूवर अत्युत्तम चमक निर्माण होते. अंतिम झालेल्या कामातील वर्खाचे ढिले किंवा असमतल कण उंटाच्या केसांनी बनविलेला कुंचा वापरून काढून टाकले जातात.

सोनेरी वर्खावर नंतर चाळणी वापरून भुकटी पसरविली जाते. सोन्याची भुकटी खूप महाग असल्याने जगभर सर्वत्र मौल्यवान धातूंऐवजी काशाची (ब्राँझ) भुकटी वापरली जाते. जेव्हा सोन्याचा वर्ख इमारतींच्या घुमट वा छतांवर वर्खकाम करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा तो पट्टीच्या (रिबिन) स्वरूपात वापरतात.[ वास्तुकला].

सोनारकामासाठी लागणारी हत्यारे : अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत कालमानानुसार सोनारकामासाठी लागणाऱ्या हत्यारांमध्ये गरजेनुरूप उत्क्रांती होत गेली आहे. हस्त साधनां-पासून ते यंत्रसामग्रीपर्यंत तसेच प्रदेशपरत्वे हे बदल झाले आहेत. तरी दागिने घडविण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत हत्यारे फारच कमी प्रमाणात बदलली आहेत. खाली काही प्रमुख हत्यारांची थोडक्यात माहिती दिली आहे.

(१) हस्त साधने : ही साधने पोलादी वा लोखंडी असतात. यांद्वारे कापणे, वाकविणे, आकार देणे, धातू ठोकून पातळ करणे आदी कामे केली जातात.

(२) कानस : वस्तू व दागिने घासण्यासाठी विविध आकारांच्या कानशी वापरतात. कानशींचे सपाट, मऊ, रू, अर्धगोलाकार, गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी इ. प्रकार असतात. [ कानसकाम].

(३) सवाणे : कातरकाम करण्यासाठी कातर, करवत, छिन्नी आदी हत्यारे वापरली जातात. तसेच कातरण्या, मुख्य कातर, स्प्रींग कातर, पत्रा कापी, रूळ कापी, बारीक कामांसाठी कडी कापी इ. वापरतात.

(४) छिद्र (ड्रिल) यंत्र : छिद्र पाडण्यासाठी हस्तछिद्रयंत्र, विजेवर चालणारे यंत्र आदी वापरतात.

याखेरीज वस्तूंची पकड घट्ट ठेवण्यासाठी सांडशी तसेच लहान-मोठ्या विविध आकाराच्या गरजेनुसार पकडी व लाकडी धारक वापरतात. आकार देण्यासाठी लाकडी वा लोखंडी हातोडा, ऐरण इ. वापरतात. झळाळी देण्यासाठी कोरण्या वापरतात. सोने तापविण्यासाठी भट्टी, वायुनलिका, वायुतापक वापरतात. दागिने, वस्तूंच्या मोजमापासाठी इंचपट्टी, गुण्या, खुणा करण्यासाठीचे साधन, जाडी मोजण्यासाठी मापक आदींचा वापर केला जातो.

इतिहास : पूर्व-मायसीनिअन : सोने, चांदी आणि त्यांच्या नैसर्गिक किंवा कृत्रिम मिश्रणाचा (इलेक्ट्रम किंवा पांढरे सोने) वापर प्राचीन ग्रीस व इटलीमध्ये दागिने, भांडी, तीर आणि शस्त्रे, नाणी, सजावट आदी कामांसाठी केला जात असे.

इजीअन भूप्रदेश (क्रीट बेटे, सायक्लॅडस् आणि इतर बेटे, ग्रीसची मुख्य भूमी, पेलोपीनीज, मध्य ग्रीस, थेसाली, मॅसिडोनिया, थ्रेस आणि ॲनातोलियाचा समुद्रकिनारा) मौल्यवान धातूंनी समृद्ध होता. ट्रॉय येथील खणनात सापडलेला खजिना इ. स. पू. २००० सालाच्या आधीचा आहे. त्यातील सर्वांत मोठ्या भागाला ‘प्रायमचा खजिना’ म्हणतात, तो त्या काळातील दागिन्यांचा व थाळ्यांचा प्रातिनिधिक संग्रह आहे. त्यामध्ये चांदीच्या मोठ्या कपात स्तनांवर पांघरले जाणारे सोन्याचे दागिने, ६ हातकंगण, ६० कर्णफुले किंवा केसात माळल्या जाणाऱ्या अंगठ्या आणि जवळपास ९,००० मणी आहेत. लूव्ह्र वस्तुसंग्रहालयातील सुरईसारखे पात्र पूर्व-मायसीनिअन ग्रीकमधील प्रारूपिक सोनारकामाचा नमुना आहे.मिनोअन आणि मायसीनिअन : सोन्याच्या दागिन्यांचे संमिश्रण ओखलॉस येथील सुरुवातीच्या मिनोअन दफनविधी केलेल्या जागेत आणि तीन चांदीची पाते असलेल्या कट्यारी कुमासा येथील थडग्यात सापडल्या आहेत. या काळातील चांदीच्या मुद्रा व आभूषणे असामान्य नाहीत. गुरनीआ येथील चांदीचा सुबक चषक मध्य मिनोअन काळातील (इ. स. पू. २००० वर्ष) आहे. मायसीनी येथील पात्रे चांदी, सोने आणि काशात बनविलेली आढळतात, मात्र पिण्याचे चषक, लहान वाडगे आणि पेट्या साधारणपणे फक्त सोन्याचीच आणि सुरया चांदीच्या बनविलेल्या असत. थडग्यामधील सामान (फर्निचर) सोन्याचेच बनविलेले असे. विशेषतः मृताच्या चेहऱ्यावरील मुखवटा सोन्याचा बनविलेला असे. अनेक थडग्यांत खूप मोठ्या प्रमाणात (एकात जवळपास ७००) सोन्याच्या लहान थाळ्या, लाकडी शवपेटिकेवर ठोकलेल्या आढळल्या. त्यांची भौमितिक रचना थक्क करणारी आहे. वर्तुळाकार, नागमोडी, ताऱ्यांच्या आणि गुच्छांच्या आकाराची तसेच पाने, फुलपाखरे आणि अष्टपाद यांसारख्या नैसर्गिक आकारातही त्यांची रचना केलेली आढळते. कफनाचे नमुने तसेच इतर आभूषणे देखील सोन्याने बनविलेली असत. या काळात बनविलेले अनेक अप्रतिम सोनारकामाचे नमुने सापडले आहेत. काळ्या स्टीअटाईटावर कोरलेली चांदीची थाळी, नॉसस येथील बैलाच्या शिराच्या आकाराचे पात्र, त्यावरील सोन्याची शिंगे, सोन्याचे आवरण असलेली मुस्की (प्राण्यांना खाता वा चावता येऊ नये म्हणून तोंडावर बांधलेले आवरण),टाळूवरील सोन्याने बनविलेले गुच्छ, कान आणि डोळे हे सर्व त्याकाळची सोनारकामातील कलाकुसर किती प्रगत होती ते दर्शवितात.

मायसीनी येथील चषक मुख्य दोन प्रकारचे आहेत : ट्रॉय येथील चांदीची भांडी आणि पात्रे व मिनोअन परंपरेतील मीनाकाम केलेली कोनीय पात्रे. स्पार्टा येथील व्हाफियो थडग्यात सापडलेले दोन सोन्याचे चषक कारागिरीचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यांच्यावर सपाट सोन्याच्या रेषा आहेत, ज्या काठावरील उठावरेखन केलेल्या बाजूंवर झाकल्या जातात.

क्रीटन आणि मुख्यभूमीतील थडग्यांतून अनेक सोन्याने मढविलेली हत्यारे मिळाली आहेत. काही हत्यारात पाते व मूठ ठोकलेल्या खिळ्यांवर सोन्याची टोपी आढळते. मात्र बहुतांशी हत्यारांच्या संपूर्ण मुठी सोन्याच्या बनविलेल्या आढळतात. मायसीनी येथील एका मुठीवरील पाकळ्यांवर लॅपीस लॅझ्युलीचा (नीलाश्माचा) वापर असलेली सोन्याची फुले मढविलेली असून त्यात स्फटिके भरलेली आहेत, तर मुठीचा संरक्षक भाग ड्रॅगनच्या आकारात बनविला आहे. मायसीनीमधील पाते काशाचे बनविलेले असून त्यावर सोने, इलेक्ट्रम, चांदी आणि निएल्लो आदी धातूंचे जडावकाम केलेले आहे. हे काम देखील तांब्याच्या साच्यांमध्ये बनविलेले आहे. हॅटशेपसूट राणीच्या थडग्यात या प्रकारचा खंजीर सापडला आहे. ती मायसीनिअन काळाची समकालीन (सोळावे शतक) होती. थिरा येथील कट्यारीवर मेंढ्यांच्या डोक्यांसारखे तर अर्गोस येथील कट्यारीवर डॉल्फिनासारखे जडावकाम केलेले आहे. व्हाफियो येथे पात्याच्या एका तुकड्यावर उडत्या माशांमध्ये एक माणूस पोहताना दाखविला आहे. हे सगळे मिनोअन कारागिरीचे सर्वोत्कृष्ट नमुने आहेत. मायसीनिअन काळाच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्यानंतर कुठलीही नवीन शैली वा निर्मिती झाली नाही. नंतरच्या सोनारकाम करणाऱ्यांनी पारंपरिक शैलीनुसारच आभूषणांची जडणघडण केली.

इराण : ॲकिमेनीडी काळापासून (इ. स. पू. ६५९-३३१) पर्शियामध्ये कुशल सोनारकाम करणारे कारागीर होते. त्यांना चेसिंग, उठावरेखन, ओतकाम, मौल्यवान खड्यांचे जडावकाम आदी तंत्रे अवगत होती. इ. स. पू. पाचव्या शतकापासून सोने व चांदीचे लहान पुतळे त्यांना ज्ञात झाले, तर याच काळात सोने व चांदीच्या भांड्यांचे आकार वाडगे, कोनीय चषक, मृत्पात्रे आणि ऱ्हायटा (प्राण्यांच्या शिराच्या आकाराचे पिण्याचे चषक) यांसारखे झाले. ब्रिटिश वस्तुसंग्रहालयातील ऑक्झस खजिना व लूव्ह्र् (पॅरिस) येथील स्यूसा खजिना यांसारख्या कामाची उत्तम उदाहरणे आहेत. पार्थियन काळापासून (इ. स. पू. २४९ -इ. स. २२६) सोनारकामावर मोठ्या प्रमाणावर ग्रीकांश (हेलेनिस्टीक) शैलीचा प्रभाव पडला. इराणी सोनारकामातील कलाकुसरीचा सर्वोच्च बिंदू सासानीद काळात (२२४-६५१) गाठला गेला. त्या काळात कारागिरांनी आकार, सजावट आणि तंत्रात खूप मोठ्या प्रमाणावर वैविध्य प्राप्त केले होते. यानंतरच्या काळात दागिन्यांमध्ये लुकण वापरण्यास सुरुवात झाली.

ग्रीक आणि इट्रुस्कन : ब्राँझ युगातून लोह युगात प्रवेश करण्याच्या काळात इजीअन प्रदेशाचे आंतरराष्ट्रीय संबंध हिंसेमुळे मोठ्या प्रमाणावर बिघडलेले होते. तो काळ संपत्ती व कला दोन्हींसाठी योग्य नव्हता. त्यामुळे ग्रीकमध्ये या काळातील सोनारकामाचे अवशेष फार कमी प्रमाणावर आढळून येतात. त्यातही फिनिशियन कारागिरांनी बनविलेल्या भांड्यांवर उठावरेखन व कोरीवकाम आढळते.

इट्रुस्कन थडग्यांमध्ये चांदीची भांडी व सौंदर्यप्रसाधने आढळली आहेत, मात्र ती जास्त प्रमाणात काशाचीच आहेत. उदा., मेट्रपॉलिटन म्यूझीयममधील चौथ्या शतकातील उटण्याचा डबा व ठोकून बनविलेला चांदीचा छोटा रथ.

संदर्भ : 1. Came, Richard, Silver, London, 1961.

2. Huges, Graham, Modern Jewelry, London, 1963.

3. Jackson, Charles J. English Goldsmiths and their marks, Dover, 1986.

4. Larkman, Brian Metalwork Designs of Today, London, 1969.

5. Reid, F. H. and Goldie, W. Gold Plating Technology, 1980.

लेखक : सु. र. देशपांडे, नितिन भरत वाघ

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश