हा आट्यापाट्या खेळाचाच सोपा व सुटसुटीत प्रकार आहे. आट्यापाट्यांमध्ये तोंड मागण्याची पद्धत आहे; तर भाबी आट्यापाट्यांमध्ये तोंड मागताना ‘भाबी’ म्हणण्याची पद्धत आहे. त्यावरूनच ह्या खेळास भाबी आट्यापाट्या हे नाव पडले आहे. त्याची प्रमुख तत्त्वे आट्यापाट्यांप्रमाणेच असली, तरी काही नियमांत फरक आहे. आट्यापाट्यांसाठी नऊ पाट्या लागतात; तर भाबी आट्यापाट्यांचे क्रीडांगण सात पाट्यांमध्ये विभागलेले असते. त्यास जागाही कमी लागते. या खेळात एखादा खेळाडू बाद झाला तरी सबंध संघाचा डाव संपला, असे धरण्यात येते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूस कौशल्य पणाला लावून दक्षतापूर्वक खेळावे लागते. मात्र प्रत्येक संघास सहा वेळा खेळण्याची व सहा वेळा पाट्या धरण्याची संधी मिळत असते. ह्या खेळात दीडकांडे चिरण्याची पद्धत आहे. सूरवाल्याने दीडकांड्यास हाताचा वा पायाचा स्पर्श करावाच लागतो आणि तो स्पर्श करून त्याने चांभारपाटीजवळच्या छोट्या पावकांड्यास स्पर्श करावयाचा असतो. ह्या दोन्ही पाट्यांस स्पर्श करण्याच्या अगोदर सूरवाल्यास खेळणाऱ्या संघातील खेळाडूंस बाद करता येत नाही. पावकांड्यास स्पर्श केल्यानंतरही त्याला आपले तोंड व शरीर लोणपाटीच्या दिशेकडे फिरवावे लागते. त्यानंतरच तो चांभारपाटीवरील खेळाडूस बाद करू शकतो. ह्या खेळात खेळाडू जमिनीवर समांतर पडून गेल्यास तो बाद ठरवला जातो. त्याचप्रमाणे एकेरी पाटी चिरताना हात पाटीबाहेर टेकून गेल्यास किंवा पाटी ओलांडून गेल्यावर कमरेवरील शरीराचा भाग जमिनीस टेकल्यास तो खेळाडू बाद धरला जातो. ह्या खेळाच्या सामन्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी सात पंच, दोन सरपंच, गुणलेखक व निरीक्षक अशा एकूण अकरा अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. हा खेळ इंदूर, हैदराबाद, पुणे इ. ठिकाणी खेळला जातो. पुण्यात १९७० साली पुणे जिल्हा भाबी आट्यापाट्या संघाची स्थापना झाली. तेव्हापासून ह्या खेळाच्या स्पर्धा पुण्यात नियमितपणे भरतात. सुमारे २०० संघ त्यात भाग देतात. ह्या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. लेखक: बाळ ज. पंडित माहिती स्रोत: मराठी विश्वकोश