(इं. ब्राझील इपेकॅक; लॅ.सेफीलिस (सायकोट्रिया) इपेकॅक्युन्हा; कुल रुबिएसी). हे एका उपयुक्त औषधाचे व्यापारी नाव असून ते मूळच्या ब्राझीलमधील लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ओषधीय वनस्पतीपासून [ ओषधि] काढतात. ही वनस्पती सु. १०–२० सेंमी. क्वचित थोडी अधिक उंच व काहीशी पसरट असते. हिला दमट व उबदार हवामान, सावली, वाऱ्यापासून संरक्षण व कुजट पदार्थ असलेली निचऱ्याची जमीन ही लागतात. तिची लागवड मलायात रबराच्या मळ्यांत करतात. भारतात दार्जिलिंगजवळ मुंगपू व निलगिरी तसेच सिक्कीम इ. ठिकाणी तिची लागवड करण्यात येते. पाने साधी, समोरा समोर, आयत अंडाकृती, अखंड, टोकदार आणि खालच्या बाजूस लवदार असतात; हिला पांढऱ्या बारीक फुलांचे स्तबकासारखे गेंद येतात; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे सुकी असतात. इतर सामान्य लक्षणे रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. हिची बारीक, वलयांकित व काहीशी गाठाळ मुळे [पहा : आकृती; मूळ] त्यातील एमेटीन व सेफेलीन ह्या अल्कलॉइडांमुळे महत्त्वाची असतात. ती अमीबाजन्य आमांश, अग्निमांद्य, दंतरोग (पायोरिया), कफ इत्यादींवर गुणकारी असून वांतिकारी, स्वेदक (घाम आणणारे), दीपक (भूक वाढविणारे) व पौष्टिक असतात; अधिक प्रमाणात विषारी. त्यांची ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. भारतात होणारे उत्पादन मागणीपेक्षा फार कमी आहे. मूलक्षोडाचाही [ खोड] मुळासारखा उपयोग करतात. लेखक : शं. आ. परांडेकर स्त्रोत : मराठी विश्वकोश