पश्चिम पाकिस्तानातील सिंधुसंस्कृतिपूर्व प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. पश्चिम पाकिस्तानात मोहें-जो-दडो या प्राचीन नगराच्या पूर्वेस सु. ४० किमी. वर हे स्थळ आहे.या ठिकाणी झालेल्या उत्खननात सिंधुसंस्कृतीच्या अवशेषांच्या थराखाली सिंधुसंस्कृतिपूर्व वस्तीचे अवशेष सापडले. या वस्तीचा कालखंड कार्बन - १४ प्रमाणे इ.स.पू. २७०० असा ठरविण्यात आला आहे. या अवशेषांत दगडी पायावर कच्च्या विटांच्या भिंती असलेली घरे, चर्ट दगडाची पाती व बाणाची टोके असून वस्ती भोवतालची कच्च्या विटांची तटबंदी व चाकावर घडवलेली पातळ व हलकी गुलाबी रंगाची मृत्पात्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मृत्पात्रांवर काळ्या रंगात नक्षीही काढलेली आढळते. तांबे व ब्राँझचा पूर्ण अभाव हे या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही संस्कृती प्राचीन आहे, याविषयी दुमत नाही.

नागरी जलविकास व्यवस्था, कोटदिजी.

संदर्भ : Wheeler Mortimer. The Cambridge History of India, Supplementary Volume, The Indus Civilization, Cambridge, 1962.

लेखक : शां. भा. देव

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश