सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, नाट्यप्रशिक्षक पद्मश्री वामन केंद्रेनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) या राष्ट्रीय नाट्य संस्थेच्या संचालकपदी पोहोचलेले बीडचे भूमिपुत्रसंगीत नाटक अकादमीच्या अंतर्गत एप्रिल १९५९ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला, 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि एशियन थिएटर इन्स्टिट्यूट' म्हटले गेले, ज्याची पहिली तुकडी १९६१ मध्ये पर्ण पूर्ण झाली. १९६५ मध्ये ही तत्कालीन शिक्षण मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय, संस्कृती विभागाच्या अंतर्गत 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' या नावाने स्वायत्त संस्था बनली. सन १९९९ मध्ये, या संस्थेने आपला पहिला राष्ट्रीय रंगमंच महोत्सव आयोजित केला, तेव्हापासून 'भारत रंग महोत्सव', साधारणपणे दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केला जातो. सन २००८ मध्ये, संस्थेने आपल्या वार्षिक नाट्य महोत्सवात, भारत रंग महोत्सवाचा, सुवर्णमहोत्सव साजरा केला, देशभरातील या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात, मुंबईतील महोत्सवाच्या उपग्रह आवृत्तीने एनएसडी पदवीधरांच्या नाटकांचे प्रदर्शन केले, ज्यात रतन थियम यांची प्रस्तावना, बन्सी कौल (अरण्यधीपती तंटिया), नीलम मानसिंग चौधरी (द सूट), संजय उपाध्याय (हरसिंगार), बहारूल इस्लाम (आकाश), मोहन महर्षी (प्रिय बापू) आणि एम के रैना (अजून थोडा वेळ राहा) यांचे सादरीकरण झाले. अशा या राष्ट्रीय स्तरावरील नाट्य संस्थेत आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र या राष्ट्रीय संस्थेचे संचालक म्हणून सन २०१३ मध्ये नियुक्त झाले ते म्हणजे पद्मश्री वामन केंद्रे...!महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्यदिग्दर्शक, नाट्यअभ्यासक, नाट्यप्रशिक्षक म्हणजेच वामन माधवराव केंद्रे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात केज तालुक्यातील दरडगाव येथे ७ जानेवारी १९५७ रोजी झाला. त्यांचे वडील माधवराव हे भारूडकार म्हणून प्रसिद्ध होते. सन १९७८ मध्ये त्यांनी बीड येथील महाविद्यालयातून बी. ए.ची पदवी घेतली. त्यानंतर सन १९७९ मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा औरंगाबाद येथून एक वर्षाचा नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे ते नाट्यशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी नवी दिल्ली येथे गेले. तेथे त्यांनी सन १९८२ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा - एन.एस.डी.) या संस्थेमधून नाट्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. एन.एस.डी. ने सन १९८२-८४ या काळात त्यांना केरळमधील स्थानिक लोकनाट्य आणि धार्मिक कर्मकांड व रंगभूमी यांच्या संशोधनार्थ दोन वर्षांची अधिछात्रवृत्ती दिली. पुढे ते मुंबईच्या 'नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेत सहसंशोधक (रिसर्च असोशिएट) म्हणून सुमारे नऊ वर्षे कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी नाट्यदिग्दर्शन सुरू केले. ते अनेक वर्षे मुंबईतील नाट्य कार्यात सक्रिय राहिले. १९७० च्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील दलित नाट्य चळवळीत अग्रणी भूमिका बजावण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातले दरडवाडी हे छोटेसे गावठाण. तिथे जन्मलेले-वाढलेले वामन केंद्रे मराठी रंगभूमीवर महत्त्वाचे नाट्यदिग्दर्शक म्हणून कारकीर्द गाजवतात, मुंबई विद्यापीठाची 'थिएटर अकादमी' उभी करतात आणि नंतर थेट दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक होतात, ही साधीसुधी गोष्ट नाही. परंतु केंद्रे यांनी ते सहजशक्य करून दाखवलं कारण, त्यांच्यावर झालेले मूळ अनागर रंगभूमीचे संस्कार. त्यांचे वडील माधवराव केंद्रे हे नामांकित भारुडकार होते. परिणामी वडिलांचं भारुड आणि त्यातील नाट्यतत्त्व पाहात-अनुभवत वामन केंद्रे मोठे झाले. ते स्वतः राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विद्यार्थी असले, तरी नागर रंगभूमीवर पाऊल ठेवताना आणि तिथे स्वतःचं वेगळेपण अधोरेखित करताना त्यांना मदत झाली, ती आपल्या मातीतल्या नाट्यतत्त्वांचीच. त्यांनी दिग्दर्शित केलेलं 'झुलवा' हे त्याचं उत्तम उदाहरण. अर्थात, केंद्रे फक्त परंपरेत अडकले नाहीत. त्यांनी रंगभूमीवर नानाविध प्रयोग केले. एक झुंज वाऱ्याशी, रणांगण, राहिले दूर घर माझे, वेधपश्य, नातीगोती, मध्यमव्यायोग यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं.वामन केंद्रे सर यांना तीस वर्षांहून अधिक काळाचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी भारतात आणि परदेशात रंगभूमीच्या विविध पैलूंवर अडीचशेहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. ते नऊ वर्षांहून अधिक काळ थिएटर डेव्हलपमेंट सेंटर, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई येथे संशोधन सहयोगी होते. एनसीपीए, मुंबई विद्यापीठ आणि रंगपीठ, मुंबईच्या प्रशासकीय आणि संस्थात्मक कारभारात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. वामन सर यांनी सल्लागार समित्या आणि प्रशासकीय परिषदांमध्ये एनएसडीची व्हिजन प्लॅन कमिटी, महाराष्ट्राच्या सरकारची राज्य मराठी विकास संस्था, राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधील नाट्य विभागाची सल्लागार समिती, गव्हर्निंग कौन्सिल आणि पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी समितीसह अनेक पदे भूषवली आहेत.मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील ती फुलराणी, लागी नजरिया, टेम्प्ट मी नॉट, दुसरा सामना, नातीगोती आदी पन्नासह्न अधिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वामन केंद्रे यांनी नेहमीच विविध सामाजिक विषय, समस्यो त्यांच्या नाटकांतून हाताळल्या आहेत आणि आपल्या कलाकृर्तीतून अनेक अस्पर्शित, दुर्लक्षित असे जगण्याचे विविध पैलू प्रेक्षकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचवले आहेत. झुलवा (देवदासी आणि जोगत्यांच्या जगण्याचं चित्रण) आणि हिंदीतील जानेमन (तृतीयपंथीयांच्या जगण्याचे चित्रण) ह्या नाट्यकृती त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. वामन केंद्रेनी 'इप्टा', मुंबई या संस्थेसाठी हिंदीत मनोज मित्र लिखित राजदर्शन (अनुवाद : प्रतिभा अग्रवाल) याचे दिग्दर्शन केले. त्यांनी भासलिखित मध्यम व्यायोग या नाटकाचे पिया बावरी (मराठी), मोहे पिया (हिंदी) व माय लव्ह (इंग्रजी) अशा तीन प्रकारे रुपांतर केले. त्यांनी भारत व भारतेतर देशात २५० नाट्य कार्यशाळांद्वारे व्यावसायिक रंगकर्मी आणि हौशी रंगकर्मीना नाट्यकलेविषयी प्रशिक्षण दिलेले आहे. हे त्यांचे कार्य गेली पंधरा-वीस वर्षे सातत्याने चालू आहे. या प्रशिक्षणातून सुबुद्ध अभिनेत्यांची, दिग्दर्शकांची, नाट्य लेखकांची (नाटककारांची) आणि अभिकल्पकाची पिढीच निर्माण झाली असून त्यांनी प्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावरील रंगभूमीवर ठसा उमटविला आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क, न्यूजर्सी, बॉस्टन, होस्टन, फिलाडेल्फिया आदी शहरात कार्यशाळा आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना खास निमंत्रित केले होते. त्यांनी केवळ नाट्यशास्त्राच्या मुख्य प्रवाहावर स्वामित्व प्रस्थापिले नाही; तर समांतर रंगभूमीवरही वर्चस्व मिळविले आणि राष्ट्रीय रंगभूमी तसेच भारतीय रंगभूमी यांत नावीन्यपूर्ण प्रवतर्नाने एक निरंतर विशेष स्थान प्राप्त केलेले आहे. त्यांनी रंगभूमीच्या माध्यमातून एक बलशाली व्यासपीठ निर्माण करून संवेदनशीलतेने समाजातीलदुर्लक्षित व उपेक्षित घटकांच्या (लोकांच्या) वेदना त्याद्वारे प्रक्षेपित केल्या, मांडल्या. वामन केंद्रे हे एक भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी ऑगस्ट २०१३ ते सप्टेंबर २०१८पर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) नवी दिल्लीचे संचालक म्हणून काम केले आहे. वामन केंद्रे यांच्या गौरी केंद्रे या पत्नी असून त्याही नाट्यकर्मी आहेत. त्यांना ऋत्विक हा मुलगा आहे.केंद्रे यांना अनेक मानसन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२), मनोहर सिंग स्मृती पुरस्कार (राष्ट्रीय) (२००४), महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्य गौरव पुरस्कार, एम्. जी. रांगणेकर पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, रंग दर्पण पुरस्कार, नाट्य परिषद पुरस्कार, अल्फा गौरव सहयोग फाउंडेशन पुरस्कार, म. टा. सन्मान (२००६), दया पवार स्मृती पुरस्कार, तर सन २०१९ मध्ये त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यातील दुसरा पद्मश्री पुरस्कार मिळवण्याचा मान वामन सरांच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्याला मिळाला हा आपल्या बीड जिल्ह्याचा गौरवच म्हणावा लागेल. तसेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाकडून बी. व्ही. कारंथ पुरस्कार (२०१९) आदीं पुरस्कारांचा समावेश होतो. सन २०१२ मध्ये संगीत नाटक अकादमीच्या मान्यतेने थिएटर दिग्दर्शनासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी प्रदान केलेल्या राष्ट्रीय पुरस्कारासह रंगभूमीतील योगदानाबद्दल त्यांना वारंवार सन्मानित करण्यात आलेले आहे. अलीकडे १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने निदेशक वामन केंद्रेच्या मार्गदर्शनाखाली 'फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप' या संकल्पनेवर आधारित आठवे थिएटर ऑलिंपिक २०१८मध्ये प्रथमच भारतात आयोजित केले होते. फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप संकल्पनेचा उद्देश रंगमंचाच्या माध्यमातून जगभरातील विभिन्न संस्कृतीच्या जनसमुदायास-विचारधारांना एकत्र आणणे हा होता. या रंगमंचीय ऑलिंपिकमध्ये तीस देशांच्या नाट्यकृतींचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये भारतातील सतरा शहरांमध्ये ४५० नाटकांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये २५० युवा-मंचाचे नाट्यप्रयोग झाले. या महोत्सवात २५,००० कलाकार सामील झाले होते आणि तो महोत्सव जवळजवळ ५१ दिवस चालला होता हे विशेष.वामन केंद्रे यांनी आज पर्यंत आपल्या कार्यातून नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन तसेच नाट्य अभ्यासक म्हणून भारतासह परदेशातही आपले वेगळेपण निर्माण केलेले आहे. भारतीय नाट्यसृष्टीमध्ये त्यांचे कार्य अतुलनीय असे आहे. वामन केंद्रे सर यांच्या आगामी काळातील कार्यासाठी दैनिक दिव्य लोकप्रभा परिवारातर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा....!शशिकांत कुलथेबीड. 9657679616