या कीटकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रौढ कीटक दूरध्वनीच्या केबलीवरील ३ मिमी. जाड शिशाच्या आवरणाला भोके पाडतो.

याचे शास्त्रीय नाव स्कोबिसिया डेक्लिव्हिस आहे. याचा समावेश कोलिऑप्टेरा गणातील बॉस्ट्रिकिडी कुलात होतो.

तो रंगाने तपकिरी, ५ मिमी. लांब व चिवट असतो. अंड्यातून बाहेर पडणारे डिंभक (अळ्या) सामान्यतः ओक, मॅपल आणि इतर वृक्षांच्या लाकडाला भोके पाडतात.

हा कीटक केबलीला भोके पाडताना तीतील काहीही भाग खात नाही असे दिसते. भोकांचा व्यास सु. २.५ मिमी. असतो.

या भोकातून केबलीमध्ये बाष्प किंवा पाणी शिरून मंडल संक्षेप (शॉर्ट सर्किट) होतो, त्यामुळे दूरध्वनी सेवेत व्यत्यय येतो. पुष्कळदा विद्युत् निरोधक पाणी शोषून घेतो व त्यामुळे निकामी होतो.

त्यामुळे दूरध्वनी सेवा बराच काळ नादुरुस्त राहते व त्यासाठी तारांना जोड द्यावे लागतात आणि पुन्हा निरोधक आवरण द्यावे लागते.

या कीटकाने १०० मी. लांबीच्या केबलीला ३७५ पर्यंत भोके पाडल्याचे उदाहरण आढळून आले आहे.

लेखक-द. र.रानडे

स्रोत- मराठी विश्वकोश