एखादी वस्तू आपल्या गुरुत्वमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती पुरेशा वेगाने फिरत असेल, तर तिला घूर्णी असे म्हणतात. विशेषकरून ज्याचा अक्ष कोणत्याही दिशेत वळू शकेल अशी बैठक दिलेल्या व ज्याच्या अक्षावरील एक बिंदू स्थिर असतो अशा चक्राला ही संज्ञा दिली जाते. इतर काही प्रेरणा न मिळाल्यास घूर्णीच्या अंगी आपल्या परिवलन अक्षाची दिशा टिकवून धरण्याचा गुण असतो. इतिहास अशा तऱ्हेचे फिरते चक्र प्रथम १८१० मध्ये बोननबर्गर यांनी बनविले. त्यानंतर १८३६ मध्ये एडवर्ड लांग यांनी एका प्रबंधात असे सुचविले की, अशा फिरत्या घूर्णीच्या साहाय्याने पृथ्वीच्या आपल्या आसाभोवतीचे परिवलन पडताळून पाहता येईल. यासंबंधीचा प्रत्यक्ष प्रयोग फूको यांनी पॅरिसमध्ये १८५२ मध्ये केला. घूर्णीविषयक संशोधनाला फूको यांच्या प्रयोगामुळे बरीच चालना मिळाली. याविषयीचे सैद्धांतिक विवेचन स्विस गणिती ऑयलर यांच्या ग्रंथात भरपूर केलेले आहे. घूर्णी परिणामाच्या काही प्रासंगिक उपयोगांखेरीज अनेक वर्षे घूर्णी ही केवळ कुतूहलजनक वस्तूच मानण्यात येत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घूर्णीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधी प्रयत्न सुरू झाले व या दृष्टीने एल्मर स्पेरी यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. या प्रयत्नातूनच स्पेरी जायरोस्कोप कंपनीची स्थापना झाली. या कंपनीतर्फे जहाजे व विमाने यांना लागणाऱ्या अनेक प्रकारच्या यंत्रणांत उपयुक्त असणाऱ्या घूर्णी प्रयुक्त्या तयार करण्यात येतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत घूर्णीच्या उपयोगास मोठी चालना मिळाली व हळूहळू अनेक प्रकारच्या यंत्रणांमध्ये घूर्णीचा समावेश करण्यात येऊ लागला. आ. १. घूर्णीचे परांचनआ. घूर्णीचे गुणधर्म १. घूर्णीचे परांचनघूर्णीचे गुणधर्म समजण्यासाठी आ. १ चा उपयोग होईल. यातील घूर्णी म्हणजे एक वजनदार चकती असून ती आपल्या प्रतलाच्या काटकोनात असलेल्या सममितीय अक्षाभोवती खूप वेगाने फिरू शकेल अशी बसविली आहे. हिचा अक्ष एका वलयात बसविला असून हे वलय अक्षाच्या रेषेत असलेल्या एका दंडाला जोडलेले आहे. दंडाचे एक टोक एका टेकूवर आधारित ठेवले आहे. जर चकती फिरती नसेल तर दंडाचा तोल एकदम ढासळेल. परंतु दंडाच्या बाहेरच्या टोकाला आधार देऊन जर चकतीला खूप वेगाने फिरविले व नंतर आधार काढून घेतला, तर क्षैतिज (क्षितिजसमांतर) प्रतलामध्ये राहून चकतीचा परिवलन अक्ष टेकूभोवती प्रदक्षिणा घालू लागेल. या प्रदक्षिणामय गतीला परांचन असे नाव दिले जाते. चकती, तिच्या भोवतीचे वलय व दंड या सर्वांचे वजन आणि त्याची टेकूवरील प्रतिक्रिया या दोन समान समांतर पण विरुद्ध दिशांत असणाऱ्या प्रेरणांमुळे निर्माण होमारे युग्म, हे या परांचन गतीचे कारण होय. प्रेरणायुग्माची दिशा त्या दोन प्रेरणांच्या प्रतलाशी काटकोनात असते असे मानण्याचा प्रघात आहे. या ठिकाणी ती दंडाशी काटकोनात पण क्षैतिज प्रतलात आहे. परांचन गती उदग्र (उभ्या) दिशेभोवती असल्यामुळे चकतीचे परिवलन, घूर्णी परिबल (फिरविणारी स्पर्शक प्रेरणा व तिचे परिवलन अक्षापासूनचे अंतर यांचा गुणाकार) व परांचनाची दिशा या तीन राशी परस्परांशी काटकोनात आहेत, हे सहज लक्षात येईल. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, परिवलनाच्या अक्षाशी काटकोनात एक प्रेरणायुग्म निर्माण केले की, या दोन्ही दिशांच्या प्रतलाशी काटकोनात असलेल्या दिशेभोवती परांचन निर्माण होते. मुलांच्या खेळातील भोवरा हा देखील अशाच प्रकारची एक घूर्णी आहे. त्याचा अक्ष जमिनीवर एके ठिकाणी टेकलेला असतो. फिरता फिरता जर भोवरा कलता झाला तर एकदम पडत नाही, फिरताच राहतो. पण त्याचा अक्ष कोणत्याही एका दिशेत स्थिर न राहता उदग्र दिशेभोवती पिंगा घालत राहतो. यालाच भोवऱ्याचे परांचन म्हणतात. परांचन गती हे कोणत्याही घूर्णीचे वैशिष्ट्य आहे. आ. २. घूर्णी परिबलांमुळे कोनीय संवेगात होणाऱ्या बदलाची सदिश आकृती. आ. २. घूर्णी परिबलांमुळे कोनीय संवेगात होणाऱ्या बदलाची सदिश आकृती. घूर्णगतीची मूलतत्त्वे कोनीय चलनाला न्यूटन यांच्या नियमाप्रमाणेच नियम लागू पडतात व त्या आधारे घूर्णीचे गुणधर्म सिद्ध करता येतात. पहिला नियम म्हणजे बाह्य प्रेरणायुग्माशिवाय वस्तूच्या कोनीय वेगात बदल होत नाही. दुसरा नियम असा की, कोनीय संवेगातील (निरूढी परिबल व कोनीय वेग यांच्या गुणाकारातील; निरुढी परिबल हे कोनीय प्रवेगास वस्तूने केलेल्या विरोधाचे माप असून ते परिवलनाच्या अक्षावर अवलंबून असते) बदलाचा कालसापेक्ष वेग हा प्रेरणायुग्माच्या सम प्रमाणात असून त्या दिशेत असतो. घूर्णीच्या परिवलनामुळे तिला काही कोनीय संवेग आसाच्या दिशेत असतो. समजा, तो कख या रेषेने दर्शविला आहे (आ. २). घूर्णी परिबलामुळे कोनीय संवेगामधील बदल घूर्णी परिबलाच्या दिशेने व त्याच्या सम प्रमाणात असतो. घूर्णी परिबलाची दिशा कखशी काटकोनात असेल, तर अल्पशा वेळात कोनीय संवेगामधील वाढ खग या रेषेने दर्शविला जाईल. चकतीचे मूळ परिवलन वेगवान असेल, तर हा बदल अत्यल्प असेल. सदिश राशींच्या गणिताप्रमाणे बदललेला कोनीय संवेग आता कग या रेषेने दर्शविला जाईल. म्हणजे त्याचे मूल्य न बदलता फक्त दिशाच बदलेल. त्यामुळे परिवलन अक्ष कख पासून कगकडे वळला जाईल. अक्ष नव्या दिशेत आल्याबरोबर त्यावरील घूर्णी परिबल अक्षाशी काटकोनात असल्यामुळे अक्ष पुन्हा आणखी थोडा वळता होईल. अशा तऱ्हेने अक्षाचे परांचन चालू राहील. परांचनाचा कोनीय वेग खालील सूत्रावरून काढता येतो. घूर्णी परिबल परांचनाचा कोनीय वेग = --------------------------------- कोनीय संवेग घूर्णीचा कोनीय संवेग हा तिचा कोनीय वेग आणि तिचे निरूढी परिबल यांच्या गुणाकाराइतका असतो (जसे वस्तूचा संवेग हा तिचा वेग आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराइतका असतो). परिवलन अक्षाचा रोख बदलू पाहणाऱ्या घूर्णी परिबलाला विरोध करण्याची प्रवृत्ती घूर्णीला आपल्या निरूढी परिबलामुळे येते. जसे एका सरळ रेषेत असलेल्या गतीमध्ये बदल करू पाहणाऱ्या प्रेरणेला विरोध करण्याची प्रवृत्ती कोणत्याही पदार्थाला आपल्या वस्तुमानामुळे येते. घूर्णीचे निरूढी परिबल पुढील दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) घूर्णीचे वस्तुमान व (२) तिच्यातील वस्तुमानाचे अक्षाभोवतीचे वाटप. अक्षापासून दूर अंतरावर वस्तुमानाचे वाटप अधिक प्रमाणात असले, तर निरूढी परिबल अधिक होते. घूर्णीची परांचन गती वाढविण्याच्या उद्देशाने जर घूर्णीच्या चाकाला समोरून धक्का दिला, तर गती न वाढता घूर्णीचा अक्ष भूसमांतर न राहता अक्षाचे बाहेरील टोक किंचित वर उचलले जाईल. कारण धक्क्यामुळे दिलेली प्रेरणा व तिची टेकूवरील प्रतिक्रिया यांचे मिळून प्रेरणायुग्म तयार होते आणि त्याची दिशा उदग्र असते. स्त्रोत : मराठी विश्वकोश