दुसऱ्या महायुद्घापूर्वीच्या काळात सामाजिक भूगोलाच्या घटकांचे पद्घतशीर वर्गीकरण करण्याकडे तसेच या विषयाचा सैद्घांतिक आकृतिबंध मांडण्यावर भूगोलज्ञांनी विशेष भर दिला नव्हता. पिअरी जॉर्ज व मॅक्सीमीलीएन सोर यांनी पहिल्यांदा असे वर्गीकरण केले (१९४३–५३). १९६० च्या दशकातील सामाजिक भूगोलाच्या विकासाचे प्रमुख तीन प्रवाह आढळतात. त्यांपैकी पहिला प्रवाह, कल्याणकारी किंवा मानवतावादी विचारप्रणालीचा. तिचा भर कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या आकृतिबंधांतर्गत निवासव्यवस्था, आरोग्य व सामाजिक चिकित्सेवर होता. दुसरा प्रवाह, मूलगामी विचारप्रणालीचा. ती मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून तिचा भर दारिद्रय व सामाजिक विषमता या समस्यांच्या मूळ कारणांच्या विश्लेषणावर होता, तर तिऱ्या प्रवाहाचा भर वांशिक किंवा धार्मिक भिन्नतेच्या अभ्यासावर होता. पाश्चिमात्य भूगोलज्ञांनी प्रामुख्याने सामाजिक कल्याणावर विशेष भर दिलेला आढळतो. कल्याणकारी राज्य म्हणजे सर्व नागरिकांच्या मूलभूत कल्याणाची जबाबदारी स्वीकारून त्यानुसार शासकीय धोरणे व कार्य करणारी राज्यसंस्था होय. पहिल्या पिढीतील भारतीय भूगोलज्ञ जॉर्ज कुरियन, एस्. पी. चतर्जी, एस्. एम्. अली, सी. डी. देशपांडे तसेच व्ही. एस्. गणनाथन, व्ही. एल्. एस्. प्रकाश राव यांनी राज्यपुनर्रचना, देशाचा नियोजनबद्घ विकास आणि नैसर्गिक संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे इ. बाबतींत नियोजन आयोगासारख्या संस्थांचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांचे मार्गदर्शन भूगोल–विषयांतर्गत होते; परंतु राष्ट्रहिताच्या दृष्टीने समकालीन प्रश्नांना अनुसरून भारतात सामाजिक भूगोल या विषयाबाबत विशेष संशोधन झाले नाही. अलीकडच्या काळात मात्र सामाजिक भूगोलशास्त्रविषयक अभ्यास होऊ लागला आहे. सामाजिक भूगोल अभ्यासाच्या केंद्रस्थानी मानव आणि समाज असला, तरी त्याच्या स्वरूप व व्याप्तीचे अंतिम प्रारूप कोणते, याविषयी सामाजिक भूगोलज्ञांनी वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यामध्ये गिल्बर्ट, टेलर, जे. एम्. हाऊस्टन, डब्ल्यू. फिट्स्जेराल्ड व एल्सवर्थ हटिंग्टन इत्यादींनी सामाजिक भूगोलाची व्याप्ती अधिक स्पष्ट केली आहे. गिल्बर्ट व हटिंग्टन यांच्या मते सामाजिक भूगोल हा विषय अत्यंत व्यापक असून त्यामध्ये भौतिक आणि सामाजिक शास्त्रांच्या उपयुक्ततेचा मिलाफ झालेला आहे. या भूगोल शाखेत प्रामुख्याने मानवी समाज व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा अंतर्भाव होतो. मानवी समाजाचे अभिक्षेत्रीय वितरण, लोकसंख्येची वाढ, घनता, संरचना, मानवी वंश, मानवी वसाहतींचा उगम, विकास, प्रारूप व त्यांचे वितरण, स्थलांतर, मानव समूहातील शारीरिक व सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक व्यवसायांतील विविधता इ. विषयांच्या अभ्यासाचा समावेश या शाखेत केला जातो. त्याशिवाय स्त्रिया, वृद्घ, गरीब, अल्पसंख्याक, मनोरुग्ण, गुन्हेगार, सामाजिक विषमता, सामाजिक विकृती, निवासाचे प्रश्न इ. समस्यांची कारणे, उपाययोजना आणि सामाजिक कल्याण यांचा विचार सामाजिक भूगोलज्ञ करीत असतात. त्याचप्रमाणे विविध प्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा या सर्व घटकांवर व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणांवर कसा परिणाम होतो, त्याचाही अभ्यास या शाखेत केला जातो. नैसर्गिक व सांस्कृतिक परिस्थितीचा एकत्रित अभ्यास ज्या ज्या विषयांत केला जातो, त्या सर्व विषयांशी सामाजिक भूगोलाचा संबंध येतो. उदा., इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वविद्या, समाज–भाषाशास्त्र इत्यादी. सामाजिक भूगोलाच्या लोकसंख्या,–भूगोल, वसाहत भूगोल–राजकीय, लष्करी व ऐतिहासिक भूगोल, पर्यटन, वैद्यक, वर्तणूक व गुन्हेविषयक भूगोल इ. उपशाखा मानल्या जातात. विकासित देशांत सामाजिक भूगोलज्ञांचा विशेष कल नागरी प्रश्नांवर असलेला आढळतो. आधुनिक समाजात आढळणाऱ्या गुन्हेगारी, बेकारी, घटस्फोट इ. समस्यांचे स्वरूप व कारणे शास्त्रशुद्घ पद्घतीने निश्चित करून, त्यांवर परिणामकारक उपाययोजना करणे, हे या शाखेच्या अलीकडील अभ्यासात गृहीत धरले आहे. समाजात निरनिराळ्या जातिधर्मांचे, वंशांचे व संस्कृतींचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या मनात परस्परांबद्दल कारणपरत्वे काही पूर्वग्र ह तयार झालेले असतात. या पूर्वग्र हांचे परिणाम त्यांच्या परस्पर संबंधांवर झालेले आढळतात. सामाजिक भूगोलाच्या संशोधनाने ते पूर्वगह कसे निराधार आहेत, हे स्पष्ट करता येते. या विषयाच्या अभ्यासाने वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश व संस्कृतींच्या लोकांमध्ये सामंजस्याची भावना निर्माण करणे शक्य होते. आधुनिक समाजरचना अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. या समाजरचनेचे पुरेसे ज्ञान व्यक्तीला झाले तरच ती व्यक्ती या समाजरचनेबरोबर परिणामकारकपणे जुळवून घेऊ शकते. सामाजिक नियोजन करणारे सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यक्रर्ते, तंत्रज्ञ इत्यादींना सामाजिक भूगोलशास्त्रीय सिद्घांतांचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्या ज्ञानाच्या आधारानेच त्यांना सामाजिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्याचे मार्ग आणि पद्घती निश्चित करता येतील. अलीकडच्या काळात सामाजिक भूगोलज्ञ मानव व समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी वेगवेगळ्या अध्यापनपद्घतींचा अवलंब करीत आहेत. उदा., प्रादेशिक, कार्यात्मक, तात्त्विक व एकात्मक दृष्टिकोन, सांख्यिकी, वैयक्तिक व तुलनात्मक अध्यापनपद्घती इत्यादी. शिवाय मानवाच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी दारिद्र्य, उपासमार, गुन्हे, वर्णभेद, सामाजिक विषमता, नैसर्गिक आपत्ती इ. बाबींची जाणीवपूर्वक दखल घेऊन अभ्यास केला जात आहे. अशाप्रकारे एकविसाव्या शतकात येऊ घातलेली विविध आव्हाने स्वीकारण्याच्या दिशेने सामाजिक भूगोलाच्या प्रगतीची वाटचाल चालू आहे. स्त्रोत : मराठी विश्वकोश Ahmad, Aijazuddin, Social Geography, New Delhi, 1999. Brunhes, J. Human Geography, London, 1952. Freeman, T. W. A Hundred Years of Geography, London, 1961. Taylor, Griffith, Ed. Geography in the Twentieth Century, London, 1962. Vidal De La Blache, P. Principles of Human Geography, London, 1962. घारपुरे, विठ्ठल, सामाजिक व सांस्कृतिक भूगोल, नागपूर, १९९९.