(वडोदरा). गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या वैभवशाली बडोदे संस्थानची राजधानी. २२०१८ उत्तर अक्षांश व ७३०१५ पूर्व रेखांश या दरम्यानच्या या शहराची लोकसंख्या ६,८०,००० (१९८१ अंदाज) होती. बगीच्यांचे शहर म्हणून गौरविलेले बडोदे अहमदाबादच्या आग्नेयीस सु. १०० किमी. विश्वामित्र नदीकाठी समुद्रसपाटीपासून ३५.५ मी. उंचीवर वसले आहे. प्राचीन काळी अंकुटिक किंवा अंकोटक (आकोटा) नावाची वसाहत या नदीच्या पश्चिम काठावर होती. वटपद्रक किंवा वडपत्रक, वीरक्षेत्र किंवा वीरावती, चंदनवती किंवा चंदनवटी यांसरखेही त्याचे नामोल्लेख आढळतात. इंग्रज प्रवाशांनी व व्यापाऱ्यांनी याचा ‘ब्रोदेरा’ असा उल्लेख केलेला असून त्यावरून ‘बडोदे’ हे नाव पडले असावे. विद्यमान शहराचे अधिकृत नाव ‘वडोदरा’ असे असून संस्कृतमधील ‘वटोदर’ या शब्दाचा हा अपभ्रंश असावा.

येथील हवामान विषय मान्सून प्रकारचे आहे. उन्हाळ्यात कमाल तापमान ४४०से. व हिवाळ्यात किमान तापमान ६०से. आढळते. पर्जन्यमान सरासरी ८४ सेंमी. असून बहुतेक वृष्टी जून ते सप्टेंबर या काळात होते. पावसाळ्यात विश्वामित्र नदीस येणाऱ्या पुरांमुळे इतिहासकाळात गावठाण अनेक वेळा हलवावे लागले.

स्त्रोत : मराठी विश्वकोश