दिशादर्शी घूर्णी (डायरेक्शनल जायरो). हे उपकरण साधारणपणे विमानात वापरले जाते. याचा अक्ष केवळ आडव्या प्रतलातच फिरू शकतो. घूर्णीला गती देण्यापूर्वी त्याचा अक्ष पाहिजे त्या दिशेत ठेवता येतो. घर्षण अगदी नाममात्र ठेवल्यामुळे बैठक कितीही हालली, तरी घूर्णीच्या परिवलन अक्षाची ती दिशा बदलत नाही. विमानाच्या उड्डाणाच्या दिशेत होणारा बदल, सर्वांत बाहेरच्या उभ्या कडीवर बसविलेल्या अंशांकित (अंश दर्शविलेल्या) पट्टीवरून समजू शकतो. प्रथम चुंबकीय दिक्सूचकाच्या साहाय्याने घूर्णीचा अक्ष विमानोड्डाणाच्या दिशेत ठेवलेला असतो. वैमानिकाला थेट समोर दर्शक दिसतो त्याच्या अनुरोधाने विमानाचे चालन करता येते. आ. ५. दिशादर्शी घूर्णी : (१) अंशांकित पट्टी, (२) घूर्णीचा परिवलन अक्ष, (३) आडवी कडी, (४) उभी कडी, (५) बैठक. आ. ५. दिशादर्शी घूर्णी : (१) अंशांकित पट्टी, (२) घूर्णीचा परिवलन अक्ष, (३) आडवी कडी, (४) उभी कडी, (५) बैठक. एखादे वळण घेताना विमानातील सर्व पदार्थ अपमध्य (मध्यापासून दूर जाणाऱ्या) प्रेरणेमुळे बाहेरील अंगास झुकतात. त्यामुळे चुंबकीय दिक्सूचकही निरुपयोगी होतो आणि चुकीचे वेधांक मिळतात. परंतु दिशादर्शी घूर्णीवर उपमध्य प्रेरणेचा परिणाम होत नाही व त्यामुळे विमान किती अंशातून वळते हे बिनचूक समजू शकते. दिशादर्शी घूर्णी हे काही पूर्णपणे दोषरहित असे साधन नाही. कितीही काळजी घेतली, तरी घूर्णीच्या अक्षाच्या धारव्यामध्ये अल्पांशाने घर्षणजन्य विरोध शिल्लक राहतोच त्यामुळे घूर्णीच्या अक्षाची दिशा सावकाश बदलत जाते. उदग्र घूर्णी दिशादर्शी घूर्णीच्या या प्रकारात घूर्णी क्षैतिज प्रतलात परिवलन करते व तिचा परिवलन अक्ष उदग्र म्हणजे उभा असतो. या साधनास ‘कृत्रिम क्षितिज’ असेही नाव दिले गेले आहे. कारण यामुळे क्षैतिज आडवी संदर्भरेषा निश्चित होते. या साधनात घूर्णीसमोर एक तबकडी ठेवलेली असते. तिच्यावर विमान मागून जसे दिसते तशी आकृती काढलेली असते. या पृष्ठभूमीवर परिवलन करणाऱ्या घूर्णीची पातळी दर्शविणारा एक आडवा दंड दिसतो. उपकणाच्या तबकडीकडे पाहणाऱ्या वैमानिकाला त्याच्या विमानाची जी हालचाल होत असते तशीच हालचाल तबकडीवरील आकृतीची होत असलेली दिसून येते. विमान अधिक उंचीवर चढत असेल, तर तबकडीवरील आकृती क्षितिजनिदर्शक आडव्या दंडाच्या वर दिसते. विमान खाली उतरत असेल, तर ती दंडाच्या खाली दिसते. अंधारातून किंवा ढगांमधून जाताना वैमानिकाला क्षितिज दिसत नाही. त्यावेळी हे साधन अतिशय उपयुक्त ठरते. उदग्र घूर्णीचा अक्ष उभा ठेवून त्यास वेग दिला असता तो अक्ष त्या ठिकाणच्या उदग्र दिशेला समांतर राहतो. परंतु पृथ्वीवरील सर्व उदग्र रेषा समांतर नसतात. ध्रुवांच्या ठिकाणची आणि विषुववृत्ताच्या दोन ठिकाणच्या उदग्र रेषा एकमेकींशी काटकोनात असतात. शिवाय विषुववृत्तावरील दोन ठिकाणच्या उदग्र रेषाही समांतर नसतात. शिवाय विषुववृत्तावरील दोन ठिकाणच्या उदग्र रेषाही समांतर नसतात. सामान्य व्यवहारात त्या समांतर आहेत असेच आपण मानतो. पण दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या विमानात हा फरक निश्चित जाणवतो. ताशी ३०० किमी. वेगाने जाणाऱ्या विमानाला त्याच्या उदग्र घूर्णीने दाखविलेल्या क्षितिज रेषांत एका तासाभरात २·७० इतका फरक दिसून येतो. उदग्र घूर्णीने दाखविलेल्या क्षितिज पातळीत व खऱ्या क्षितिज पातळीत अनुभवास येणारी भिन्नता काढून टाकण्यासाठी या उपकरणात स्वयंचलित यंत्रणा योजलेली असते. ६. उदग्र घूर्णी (कृत्रिम क्षितिज) : (अ) विमान चढताना, (आ) विमान उतरताना : (१) क्षितिजनिदर्शक दंड.आ. ६. उदग्र घूर्णी (कृत्रिम क्षितिज) : (अ) विमान चढताना, (आ) विमान उतरताना : (१) क्षितिजनिदर्शक दंड. स्त्रोत :मराठी विश्वकोश