समुद्रमंथन `समुद्रमंथन’ ही कथा नाशिकच्या कुंभमेळ्याशी अधिक जवळीक साधते ती गोदावरीच्या जन्मकथेमुळे. म्हणूनच नाशिकच्या कुंभमेळ्याचे महत्त्व इतरांपेक्षा वेगळे असल्याचे म्हटले जाते. मंथनाचा काळ आणि नाशिकच्या गोदावरीचा जन्म हा एकाच मुहूर्तावर झाला म्हणून दक्षिण काशीच्या नाशिकच्या कुंभपर्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे काशीच्या खालोखाल धार्मिक, पौराणिक, वैदिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेले क्षेत्र (शहर) म्हणून नाशिकला अधिष्ठान प्राप्त झाले. आद्यशंकराचार्यांच्या काळात नाशिक हे धर्मपीठ होते. येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते, म्हणून तिचे पावित्र्य अधिक आहे. अमृतकुंभाचा थेंब नेमका रामकुंडात पडला की त्र्यंबकच्या कुशावर्तात याबाबत वाद आहेत. मात्र, यापूर्वी येथे कधीच कुंभमेळा भरत नव्हता. रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थाची परंपरा माधवराव पेशव्यांनी सुरू केली. याविषयी.... इतिहास कुंभमेळा ही सहस्रवर्षांपासून चालत आलेली परंपरा असल्याचे उल्लेखही इतिहासात आढळतात. काही विद्वानांच्या मते इ.स. पूर्व ३४६४ मध्ये या याचा प्रारंभ झाला असावा, असे म्हटले जाते. म्हणजेच हडप्पा आणि मोहेनजोदडो संस्कृतीच्या एकसहस्र वर्षांपूर्वीपासूनची ही परंपरा असल्याचे म्हटले जाते. इ.स. पूर्व २३८२ मध्ये विश्वामित्र द्वितीय यांनी माघ पौर्णिमेला स्नान करण्याचे महत्त्व सांगितले तेव्हापासून कुंभमेळा भरतो, असा उल्लेखही आढळतो. तर इ.स. पूर्व १३०२ मध्ये महर्षी ज्योतिष यांनी पौष पौर्णिमेच्या स्नानाचे महत्त्व सामान्यजनांमध्ये रुजविले असे म्हटले जाते. चिनी यात्री ह्युएनत्संग याने इ.स. ६२९ मधील ‘भारतयात्रेचे वर्णन’ या पुस्तकात कुंभमेळ्याचे वर्णन केले आहे. त्यात सम्राट हर्षवर्धनच्या राज्यात प्रयाग येथे हिंदूंचा अशा प्रकारचा मेळा भरविला जात असल्याचा उल्लेख सापडतो. मात्र, हिंदूंच्या या धार्मिक उत्सवाला खऱ्या अर्थाने वैदिक रूप देऊन प्रतिष्ठा मिळवून देण्यात आदि शंकराचार्यांचे कार्य मोठे असल्याचे मानले जाते. त्यांनी कुंभमेळ्यात विविध साधुसंतांना व निरनिराळे धर्म आणि संप्रदाय यांच्या साधुसंतांना यात भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यांच्याच प्रेरणेने प्रयाग येथील कुंभमेळ्यात भारतातील निरनिराळे धर्म आणि संप्रदाय यांतील साधुसंतांनी भाग घेण्यास प्रारंभ केला. नाशिकबाबत पुराणात अथवा प्राचीन काळापासून कुंभमेळा कोठे भरत होता याचे पुरावेही मिळत नाहीत. १७७० नंतरच्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पुरावे मिळतात. त्यापूर्वीच्या सिंहस्थाचे कोणतेच पुरावे हाती लागत नाहीत. पण, प्राचीन काळापासून कपिलधारा व चक्रतीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा भरत असावा याचे मात्र पुरावे मिळतात. यावरून सिंहस्थ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला पेशव्यांमुळे भरू लागला असेही म्हणता येते. याबाबत पुरावेही मिळतात. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझे गावातील चक्रतीर्थावर व कावनाई येथील कपिलधारा तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा भरत असे. १७४६ मध्ये सिंहस्थ काळात चक्रतीर्थावर स्नानावरून वाद झाले. यात १२ हजार साधू आखाड्यांमधील युद्धात मारले गेले. ही लढाई चक्रतीर्थाजवळ झाल्याचे पुराणात उल्लेख सापडतात. हा काळ पेशवाईचा होता. माधवराव पेशवे तेव्हा गादीवर होते. या आखाड्यांचे स्नानासाठी तंटे पेशव्यांनी सोडविले. त्यामुळे १७५८ पासून शैवपंथातील जुना, निरंजनी, आनंद अटल, आवाहन, अग्नि, महानिर्वाणी, बडा उदासिन, नया उदासिन आणि निर्मल आखाड्याचे साधू-संत त्र्यंबकेश्वरी कुशावर्तावर, तर वैष्णव संप्रदायातील निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर पंथातील साधुसंत नाशिकच्या रामकुंडावर शाहीस्नान करू लागले. पेशव्यांनी साधुची गर्दी लहानशा कपिलधारा तीर्थावर होऊन पुन्हा वाद होऊ नये म्हणून त्यांची विभागाणी त्र्यंबक येथील कुशावर्त व नाशिकचे रामकुंडावर केली. मात्र यातून कपिलधारा व चक्रतीर्थाचे सिंहस्थ म्हणून असलेले महत्त्व कमी झाले. अजूनही सिंहस्थाचा प्राचीन इतिहास माहित असलेले आखाडे व साधू पर्वण्यांसाठी या दोन्ही तीर्थांवर स्नानासाठी सिंहस्था दरम्यान येतात. पेशव्यांच्या निकालापूर्वी त्र्यंबक अथवा रामकुंडावर कधीही सिंहस्थ पर्वणी झाली नाहीत. त्यामुळे अमृतकुंभातील थेंब कपिलधारा व चक्रतीर्थावरच पडले असतील, असे मानायला हरकत नाही. माधवराव पेशव्यांनी साधुंमधील भांडणे सोडवली अन् एक निकालपत्र दिले. त्या निकालपत्राची प्रत कपिलधारा तीर्थावर अजूनही आहे. हा ताम्रपट मोडीत आहे. ताम्रपटावरील माहितीवरून सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूपसमोर येते. गरज, काळ आणि परिस्थितीनुसार सिंहस्थ पर्वण्याच्या जागांमध्ये अन् दिशांमध्ये बदल झाल्याचेही यातून दिसते. पर्वण्यांच्या जागा बदलल्या असल्या, तरी त्याचे महत्त्व मात्र कोठेही कमी होत नाही, हेही दिवसेंदिवस वाढणाऱ्या भक्तांमुळे सिद्ध होते. साधुमहंतांच्या आखाड्यांनी कुंभमेळ्याची परंपरा काळाच्या ओघातही कायम ठेवली आहे. शैवांचे दहा, तर वैष्णवांचे तीन आखाडे असतात. या सर्वांची मिळून एक अखिल भारतीय आखाडा परिषद असते. नाशिकच्या कुंभमेळ्यात सहभागी होणारे तीन आखाडे आणि त्यांचे साडेसहाशे खालसे मुख्य पर्वणीच्या दिवशी मिरवणुकीने स्नानासाठी जातात. पंचवटीतील तपोवन येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून शाही मिरवणुकीस प्रारंभ होतो. काशी, हरिद्वार, ऋषिकेश, प्रयाग, तिरुपती आणि अलीकडच्या काळातील शेगाव, शिर्डी, नांदेडनंतर धार्मिक अर्थशास्त्र प्रवाहित करणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. नाशिक हे उपासना, नित्य श्राद्ध आणि दानधर्माचे क्षेत्र आहे. काशी, अयोध्या, वृंदावनाप्रमाणे नाशिकलाही पंचक्रोशी प्रदक्षिणेचे महत्त्व होते. रामकुंडालगत असलेल्या चतु:संप्रदाय आखाड्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरापासून ही प्रदक्षिणा सुरू होई. कपालेश्वर, सांडव्यावरची देवी, तपोवन, कालिका मंदिर, रविवार पेठेतील तुळजाभवानी मंदिर, रेणुका मंदिर, रामवाडीतून पुन्हा विठ्ठल मंदिर असा हा क्रम होता. काही यात्रेकरू सोमेश्वर ते तपोवन अशी प्रदक्षिणा करीत. नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक अशी कंठप्रदक्षिणा प्रसिद्ध होती. यात गोदावरीतील आठ मुख्य आणि ५० ते ५४ उपतीर्थांचा समावेश होता. मात्र सध्या अनेक तीर्थ बुजविण्यात आली आहेत. काळाच्या ओघात नाशिकच्या सिंहस्थात अनेक बदल झाले मात्र श्रद्धा अन् भक्तीचा महापूर कायम आहे. पेशव्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य स्वरूप मिळवून देण्यासाठी सुंदर घाट व मंदिरे बांधली. आखाड्यांना निधी दिला. साधुमंहतांची व भक्तांना सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे १७५८ पासून सिंहस्थाला जगभरातून साधू येऊ लागले. मात्र, प्राचीन अशा कपिलधारा व चक्रतीर्थाला विसरण्यात काही अर्थ नाही. चक्रतीर्थाची अवस्था बदललेली नाही. चक्रतीर्थ धरणात गेल्याचेही म्हटले जाते. मात्र चक्रतीर्थ अजूनही बेझे गावातच आहे. कपिलधारा तीर्थाचा व परिसराचा विकास सिंहस्थ निधीतून करण्यात आला आहे. हे तीर्थ आवर्जून पहावे असे आहेच. हा प्राचीन इतिहास न विसरता नवीन परंपरांना स्वीकारले गेले पाहिजे. तरच धर्म, भक्ती, भाव यांचा अनोखा संगम होईल व सिंहस्थाचे पूण्य पदरात पडेल. लेखक : रमेश पडवळ इमेल : rameshpadwal@gmail.com संपर्क: 8380098107