यशोगाथा शाळेचे नाव व पूर्ण पत्ता - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामूनाईक तांडा, पोस्ट पाचेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड 431143 शाळेचे व्यवस्थापन - जिल्हा परिषद बीड शाळेचे माध्यम - मराठी शाळेतील इयत्ता - 1ली ते 4थी एकूण विद्यार्थी संख्या - 30 प्रास्ताविक तंत्रज्ञानासोबतच कला व संस्कृती शिक्षण देणारी जिल्हा परिषद दामूनाईकतांडा शाळा आजचे एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे. क्षणोक्षणी आज बदलणारे तंत्रज्ञान आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा तितकाच चिरकालीन आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पावलाने मानवी जीवन पादाक्रांत केलेले आहे. मग आजच्या या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर करणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. पण आज तंत्रज्ञानातून होणारे शिक्षण बोथट व भावनाशून्य होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला नवविचारांची संजीवनी देण्यासाठी संस्कृती व कला याचा वापर प्रभावीपणे केल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होण्यास नक्कीच मदत होईल. अशाच या तंत्रज्ञानाबरोबरच कला आणि संस्कृती याच्या सुयोग्य अध्यापनातून विद्यार्थी व्यक्तिमत्व फुलवणारी शाळा म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामूनाईक तांडा ही होय. मुख्याध्यापक/ शिक्षक यांना आलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना गेवराई तालुक्यातील पाचेगाव केंद्र अंतर्गत दामूनाईकतांडा हा एक छोटासा तांडा. या तांड्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामूनाईकतांडा ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असणारी शाळा स्थित आहे. या तांड्यावरचे बहुतांश पालक ऊसतोड कामगार असून सर्व लोक हे बंजारा समाजाचे आहेत. ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे हे सर्व पालक वर्षातील अधिक काळ ऊसतोडीसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर स्थलांतरित होतात. सुरुवातीला या पालकांसोबत त्यांचे मुलंही स्थलांतरित होत असत. शाळेतील शिक्षक यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सरपंच, नागरिक आणि पालक यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची माहिती सर्वांना दिली. त्यामुळे सर्व पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या सोबत स्थलांतरित न करता गावातच ठेवण्याची तयारी दर्शवली. या सर्व मुलांच्या शिक्षणासोबतच जेवणाची सोय ऊसतोड मुलांच्या वस्तीगृहाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे शाळेतील या सर्व मुलांचे स्थलांतर रोखून शाळाबाह्य विद्यार्थी संख्या शून्य होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले? आता पुढे काय? तर सर्वप्रथम या शाळेतील विद्यार्थ्यांची जी मातृभाषा किंवा बोलीभाषा होती ती लमाणी म्हणजेच गोरमाटी भाषा. तर शिक्षणाचे माध्यम मराठी. मग या विद्यार्थ्यांना बोलीभाषेकडून प्रमाणे भाषेकडे घेऊन जाण्यासाठी सर्वप्रथम शाळेतील शिक्षक श्री गोरख काळे यांच्या अनुभवाचा या भाषेच्या माहितीसाठी उपयोग झाला. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक श्री शशिकांत कुलथे यांनी याच्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून आपले सहकारी मित्र, इतर शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून गोरमाटी भाषेतील शब्द, दैनंदिन जीवनातील विविध वाक्य, याबरोबरच विविध शालेय वाक्य एकत्रित करून गोरमाटी भाषा म्हणजेच बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे घेऊन जाणारे सचित्र पुस्तक हसत खेळत शिकूया तयार केले. या पुस्तकाच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे घेऊन जाण्यासाठी, तसेच सोप्याकडून अवघडाकडे या सूत्रानुसार त्यांच्याच भाषेतून संवाद साधून हळूहळू मराठी प्रमाण भाषेमध्ये बोलण्यास प्रवृत्त केले. हळूहळू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतच एकमेकांशी बोलणे संवाद साधने अशाप्रकारे मराठीच्या वापरावर अधिकधिक भर देण्यात येऊ लागल्याने विद्यार्थी मराठीचा वापर सुयोग्य प्रकारे करू लागले. विद्यार्थी स्थलांतर रोखले, शाळेतही येऊ लागले,मग आता या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आपल्या नेहमीच्या पद्धतीने न देता त्यामध्ये काहीतरी तंत्रज्ञानयुक्त नाविन्यपूर्ण आणि आनंददायी पद्धतीने बदल केल्यास हे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासावृद्धी करणारे ठरेल तसेच कला व संस्कृतीद्वारे हे ज्ञान आनंददायी स्वरूपात दिल्यास त्याद्वारे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकसित होण्यास सहाय्यभूत ठरेल यासाठी शाळेचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत कुलथे यांनी विविध उपक्रम हाती घेतले. शशिकांत कुलथे हे सीसीआरटी नवी दिल्लीचे प्रशिक्षित शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक असून संगीत गायन पारंगत तथा तबला विशारद आहेत. त्यामुळे अशा या संगीतकलेचा आपल्या शालेय दैनंदिन अध्ययन अध्यापनात प्रभावी उपयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण संगीत ही सर्वश्रेष्ठ ललितकला आहे यासाठी कुठल्याही भाषेची आवश्यकता नाही. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कला संवर्धन व्हावे या हेतूने त्यांनी स्वतः मराठी, इंग्रजी विषयाच्या सर्व कविता स्वरबद्ध करून त्या विद्यार्थ्यांना शिकविल्या, त्याबरोबरच गीतमंचातील विविध प्रार्थना, देशभक्ती गीते, समूहगीते, सीसीआरटी निर्मित विविध प्रादेशिक गीते, विद्यार्थ्यांना शिकवली.इंग्रजी सारख्या कठीण वाटणाऱ्या विषयाच्या कविता स्वतः विद्यार्थी ताला सुरात हावभावयुक्त सादर करू लागले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी विविध वर्गामध्ये ई लर्निंग साहित्य उपलब्ध केले. एग्युमेंटेड रियालिटी 4d कार्ड्स याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हर्चुअली प्रकारचे शिक्षण, याचबरोबर शाळेचा ब्लॉग, फेसबुक, व्हाट्सअप ग्रुप, युट्युब चॅनेल, विविध विषयाचे व्हिडिओ निर्मिती करून त्यांचे क्यू आर कोड तयार करून त्याचा विद्यार्थी वापर करीत आहेत. याचबरोबर प्लिकर्स कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तेही अल्प वेळ, श्रम व पैशांमध्ये करण्यात येवू लागले. याबरोबरच शाळेतील विविध उपक्रमांची प्रसिद्धी माझी जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या ब्लॉगवरही देण्यास सुरुवात केली. संस्कृती जतन संवर्धन व परिचय करण्यासाठी विविध भित्तीचित्र, भित्तिपत्रिका यांची निर्मिती करून प्रत्येक आठवड्यास एका विषयाची माहिती वर्गामध्ये देण्यास सुरुवात केली. शाळेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये होणारे हे बदल आणि शाळेतील शिक्षकांची तळमळ पाहून गावातील पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व पदाधिकारी यांनी समाज सहभागातून शाळेसाठी निधी उपलब्ध करून देत कॉम्प्युटर, स्मार्ट एलसीडी टी.व्ही., चार्जेबल साऊंड सिस्टिम, शालेय परिसरात पेव्हर ब्लॉक, तसेच शाळेभोवती तारेचे कंपाउंड तयार करून दिले. यामुळे सहाजिकच शाळेतील अंतरंगसोबत बाह्यरंगही आकर्षक होण्यास मदत झाली. शाळेच्या या नव्या रूपामुळे ही शाळा केंद्रात तसेच परिसरात नावारूपास आली. या शाळेमध्ये विविध राबवलेल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये खालील उपक्रमांचा समावेश आहे. बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे त्यांच्या शाळेत प्रामुख्याने बंजारा समाजातील गोरमाटी बोलीभाषा बोलणारे सर्व विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यामुळे प्रारंभी त्यांनी गोरमाटी भाषेचा अभ्यास करून बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे घेऊन जाण्यासाठी हसत खेळत शिकूया या सचित्र पुस्तकाचे लेखन करत, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे घेऊन जाणारे शिक्षण सुरू आहे. ऑगमेन्टेड फोर डी प्लस फ्लॅश कार्ड या प्रकारच्या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना प्रत्यक्ष स्वरूपात अनुभवयास देण्यात येतात. यामध्ये अॅनिमल फोर डी, डायनासोर फोर डी, स्पेस फोर डी, ऑक्युपेशन्स फोर डी, आपली पृथ्वी रचना, आपले शरीर रचना, आपली सूर्यमाला, ग्रह व तारे, वनस्पती अवयव रचना, प्राणी अवयव रचना, मर्ज क्यूब, ज्वालामुखी, वनस्पतीची वाढ, सागरतळ रचना,यासह ३६ हून अधिक अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना स्वानुभवातून शिकण्यास मिळतात. प्लीकर्स कार्ड्सद्वारे मूल्यमापन विविध पाठ्यघटकावर आधारित विद्यार्थ्यांचे अल्प श्रम, अल्प वेळ, अल्प खर्चामध्ये तात्काळ मूल्यमापन प्लीकर्स कार्डद्वारे करण्यात येते. यामुळे विद्यार्थी निहाय, वस्तुनिष्ठ, कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात मूल्यमापन होण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या चुकांची प्रत्येक विद्यार्थिनिहाय तात्काळ दुरुस्ती करता येते. स्वयम् व शाळा ब्लॉग निर्मिती शाळेतील आयोजित विविध उपक्रम, विद्यार्थी प्रतिसाद, विद्यार्थी कला संवर्धन, यांची माझी जिल्हा परिषद शाळा या स्वयम् निर्मित ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुणांचा विकास होण्यास मदत होत आहे. याबरोबरच स्वतःचा शशीज व्ह्यू या नावाने ब्लॉग निर्माण केलेला असून यावर विविध कला क्षेत्रातील कलावंत तसेच उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक यांच्या कार्याचा परिचय देण्यात आलेला असून याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देशांमधून 6.0 K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या आहेत. यूट्यूब चैनल निर्मिती व उपयोग शशिकांत कुलथे यांनी स्वतःचे यूट्यूब चैनल निर्मित केले असून या चैनल वर विविध वर्गनिहाय, विषयनिहाय विविध पाठ्यघटकांवर आधारित अॅनिमेटेड व्हिडिओ स्वतः तयार करून आपल्या यूट्यूब चैनलवर अपलोड केलेले आहेत. या सर्व व्हिडिओचे क्यू आर कोड तयार करून त्यांचा उपयोग शाळा व परिसरातील इतर विद्यार्थीही आपल्या शाळेसोबतच घरीही मोबाईलचा वापर करून करीत आहेत. क्यूआर कोड व स्मार्ट पीडीएफची निर्मिती पाठ्यघटकावर आधारित स्वनिर्मित व्हिडिओ आणि विविध चाचणी परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या वेळेनुसार, आवडीनुसार शाळेत तसेच शाळेच्या व्यतिरिक्त पूर्ण करता येण्यासाठी क्यूआर कोड आणि स्मार्ट पीडीएफची निर्मिती करून त्याचा वापर केला जात आहे. स्लाईड प्रोजेक्टरचा प्रभावी वापर भारतीय सांस्कृतिक संपदेतील विविध कला, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, विविध वास्तु, गड, किल्ले, विश्व सांस्कृतिक संपदा, यांची सचित्र माहिती विविध स्लाइड व प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येते. संगीतातून आनंददायी शिक्षण संगीत ही सर्वश्रेष्ठ ललित कला म्हणून सुपरिचित आहे. संगीतातील स्वर आणि भाव यासाठी कुठल्याही भाषेची गरज लागत नाही. त्यामुळे कुलथे यांनी शालेय अध्ययन अध्यापनात संगीताचा प्रभावी उपयोग करण्यासाठी सर्व वर्गांच्या मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातील कविता स्वतः स्वरबद्ध केल्या.त्या सर्व कविता विद्यार्थी तालासुरात सादर करतात.याबरोबरच गीतमंचातील प्रार्थना, देशभक्ती गीत, सामूहिक गीत, सीसीआरटीचे विविध प्रादेशिक भाषेतील गीते, सर्व विद्यार्थी उस्फूर्तपणे सादर करतात. आकाशवाणी कार्यक्रमाचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी संगीत मंचाच्या माध्यमातून आकाशवाणी केंद्र बीडद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले अनेक कार्यक्रम बालजगत या सदरामध्ये प्रसारित करण्यात आलेले आहेत. भित्तीपत्रके व भित्तीफलक विविध लोकनाट्य, लोकनृत्य, भारतातील आठ राष्ट्रीय प्रतीके, विश्व सांस्कृतिक संपदा, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश येथील गड व किल्ले, विविध वाद्य व प्रकार, शास्त्रीय नृत्य, रांगोळी, हस्तकला, बाहुली नाट्य, मंदिर, मस्जिद, चर्च व स्तूप रचना, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, संत यांचा भित्तीफलक व भित्तीचित्रांच्या माध्यमातून परिचय दिल्यामुळे भारतीय सांस्कृतिक संपदा परिचय, जतन व संवर्धनाचे धडेच विद्यार्थ्यांना देण्यात येतात. डीजीटल बॅनरद्वारे स्वयंअध्ययन शाळेतील विविध वर्गनिहाय, व विषय निहाय विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी डीजीटल बॅनरचा उपयोग केला जातो. याद्वारे विद्यार्थी गटागटामध्ये तसेच वैयक्तिकरित्या तसेच दत्तक मित्र अंतर्गत स्वयंअध्ययन करत आहेत. शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग शाळेत उपलब्ध असणाऱ्या स्मार्ट टीव्ही, संगणक याद्वारे डिजिटल अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाची पीडीएफ पुस्तके, फ्लीप ई बुक्स यांचा वापर, इंग्रजी विषयाचे सॉफ्टवेअर, सर्व वर्गाचे ई-लर्निंग अभ्यासक्रम, सर्व वर्गांच्या चाचण्या, प्रश्नपेढी, याद्वारे विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. विविध क्लबची स्थापना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शाळा, गाव, परिसर, राज्य आणि आपला देश यासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी तसेच विविध कलागुणांचा विकास करण्यासाठी शाळेमध्ये युनिस्को नवी दिल्ली मान्यताप्राप्त युनोस्को क्लब, विपनेट नवी दिल्ली यांची मान्यताप्राप्त चंपावती सायन्स क्लब, सीसीआरटी द्वारा आयोजित सीसीआरटी क्लब, कला व संस्कृती क्लब, क्रीडा क्लब, पुस्तकवाचन क्लब, इको क्लब, यांची स्थापना केलेली आहे. भाषा संगम उपक्रमाद्वारे विविध भाषांची ओळख दिली जात आहे. इंग्रजी भाषा संवर्धन प्रत्येक इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर करून इंग्रजी भाषा संवर्धन करण्यासाठी इंग्रजी सुधार प्रकल्पाअंतर्गत लिप फोर वर्ड यांचे उपक्रम शाळास्तरावर आयोजित करून गेवराई तालुक्यातून प्रथम तर बीड जिल्ह्यात तृतीय क्रमांक संपादन केलेला आहे. तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना धूम्रपान, तंबाखू, विडी, सिगारेट,अशा आरोग्यास घातक सवयींचे दुष्परिणाम सांगून त्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी सलाम फाउंडेशन नवी मुंबई यांच्याद्वारे आयोजित तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमात सहभागी होऊन गेवराई तालुक्यातून पहिली तंबाखूमुक्त शाळा म्हणून बहुमान मिळविला आहे. आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन या उपक्रमांतर्गत शाळेतील विविध विषयांसोबतच कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांच्या माध्यमातून इतर विषयांचा समन्वय साधत आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येते. शालेय विषय अर्थात मराठी गणित इतिहास भूगोल आणि विज्ञान या विषयातील विविध पाठ्य घटक कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांच्या सुयोग्य अशा समन्वयातून अध्यापन केले जाते. क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील विविध ग्राम पंचायत, नगरपरिषद, साखर कारखाना, अग्निशमन दल, पाणीपुरवठा विभाग, मंदिर मस्जिद, चर्च, शेततळे, अशा परिसरातील विविध ठिकाणांना भेटी देऊन त्यांची माहिती प्रत्यक्ष स्वरूपात करून देण्यात आलेली आहे. याबरोबरच हस्तलिखित निर्मिती व प्रकाशन, क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, आकर्षक वेशभूषा स्पर्धा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, मराठी, इंग्रजी, हिंदी परिपाठ आयोजन, मराठी, इंग्रजी हस्ताक्षर सुधार प्रकल्प, राष्ट्रीय सण, दिनविशेष, विशेष दिन, जयंती, पुण्यतिथी, साजरा करणे, विविध स्पर्धा आयोजन व सहभाग अशा अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात्मक उपक्रमांचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येत आहे. ज्याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व चतुरस्त्र होण्यास मदत होत आहे. शाळेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी शाळेतील सहशिक्षक श्री शशिकांत संभाजीराव कुलथे यांना भारत सरकारचा सन २०२२ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार भारताचे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान. विपनेट सायन्स क्लब अंतर्गत भारतातून राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या क्लबमध्ये शाळेची निवड. लिप फॉरवर्ड या इंग्रजी उपक्रमात जिल्ह्यातून तृतीय तर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवणारी शाळा. तालुक्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा. युनेस्को क्लबची स्थापना करून अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभाग घेणारी जिल्ह्यातील पहिली शाळा. नासाच्या मिशन मार्स २०२० बोर्डिंग तिकीट रजिस्टर करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा. शाळा सिद्धि अंतर्गत अ श्रेणी प्राप्त.