शोभा किशोर जयपूरकर या गेली 16 वर्षांपासून नागपूर येथून “कलम का गौरव” या वृत्तपत्राचे यशस्वीरित्या संपादन, प्रकाशन करीत आहेत. पत्रदृष्टीतील त्यांची ही यशकथा सर्वांना प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे. पूर्वाश्रमीच्या शोभा नामदेवराव बोंदरे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1974 रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे बारावी झाल्यावर त्या नोकरीसाठी नागपूर येथे आल्या. तेथे त्या त्यांचे काका वासुदेवराव बोंदरे यांच्याकडे राहू लागल्या. त्यांच्याकडे त्या दोन वर्षे राहिल्या. या काळात त्यांनी एका शाळेत आवक-जावक लिपीक म्हणून काम पाहिले. शिवाय पहाटे त्या 7.30 पर्यंत दूध वाटायचे काम करायच्या. ते काम झाल्यावर साडेनऊपर्यंत त्या मुलांच्या शिकवणी घ्यायच्या. नंतर शाळेत जाऊन काम करायच्या. शाळेतून संध्याकाळी घरी आल्यावर त्या चहा पावडरही विकायच्या. त्यानंतर पुन्हा मुलांच्या शिकवणी घ्यायच्या. नोकरी करीत पुढे शिकायची त्यांची फार इच्छा होती. पण चांगले स्थळ सांगून आले आहे, म्हणून घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांचा 19 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतरही काही तरी आव्हानात्मक काम करायचे त्यांच्या मनात होते. त्याचवेळी त्यांना एका परिचिताने एका वृत्तपत्रात मार्केटिंगमध्ये जागा आहे म्हणून सांगितले. तिथे त्यांची निवड झाली. या वृत्तपत्रात काम करत असतानाच त्यांना पत्रकारितेची गोडी निर्माण झाली. तेथून त्या महासागर वृत्तपत्रात जाहिरातींचे व प्रुफ रिडिंगचे काम करु लागल्या. जाहिरातींच्या अनुभवामुळे त्यांनी गौरव पब्लिसिटी ही स्वत:ची जाहिरात संस्था काढली. ही एजन्सी त्यांनी 3 वर्षे चालवली. परंतु त्यांच्यातील गुण हेरुन माहिती कार्यालयातील नरेश मेश्राम यांनी त्यांना स्वत:चे वृत्तपत्र काढण्याचे सुचविले. एवढेच नव्हे तर पुढे सतत आवश्यक ते मार्गदर्शनही केले. अशा प्रकारे दि. 16 जुलै 2000 रोजी ‘कलम का गौरव’ हे साप्ताहिक वृत्तपत्र त्यांनी सुरु केले. या कामात त्यांना फारच आवड निर्माण झाल्याने त्यांनी जाहिरात संस्था बंद केली. त्याकाळी नागपूरच्या पत्रकारितेत फारशा महिला नव्हत्या. गुन्हेगारी क्षेत्रातील पोलीस तपासाचे वृत्तांकनही त्या धाडसाने करत हे विशेष. पुढे 2 वर्षात त्यांचे वृत्तपत्र महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात यादीवर आले. त्यामुळे शासनाच्या आणि अन्य निमशासकीय जाहिराती त्यांना मिळू लागल्या. यातून वृत्तपत्राला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. या वृत्तपत्राच्या कामासाठी नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सातत्याने स्वत: फिरुन बातम्या, लेख मिळविणे अशी सर्व कामे त्या करु लागल्या. 2004-05 साली त्यांना शासनाची अधिस्वीकृती पत्रिका मिळाली. यामुळे त्यांना त्यांच्या कामात मोठीच मदत होत गेली. आज त्यांचे वृत्तपत्र चांगले चालत असून या वृत्तपत्राने स्वत:चे एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हिंदी व मराठी असे त्यांचे द्वैभाषिक वृत्तपत्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पत्रकारितेबरोबरच शोभा जयपूरकर सक्रिय सामाजिक कार्यही करीत असतात. कौटुंबिक कलह सोडविणे, परिसरातील विविध अडीअडचणी सोडविणे, व्यसनमुक्तीच्या चळवळीत सहभागी होणे, मुलामुलींना योग्य मार्गदर्शन करणे, अन्य विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे असे त्यांचे कार्य सतत चालू असते. त्यांच्या पत्रकारितेबद्दल व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा विविध संस्थांनी गौरव केला आहे. त्यांच्या या कार्यात प्रिंटिंग व्यवसायात असलेले त्यांचे पती किशोर जयपूरकर आणि चि. गौरव, आई सुमन यांचे सक्रिय प्रोत्साहन व सहभाग असतो. घरातील सर्व भावंडांमध्ये शोभा या सर्वांमध्ये थोरल्या. त्यामुळे शाळा शिकत असतानाच त्यांना घराबरोबर शेतीतील पडतील ती कामे करावी लागायची. पुढे नागपूरला गेल्यावर खेड्यातील मुलगी म्हणून खूप हेटाळणी, अपमान वाट्याला आले. पण खचून न जाता व पराभूत होऊन गावीही न जाता नागपूरमध्येच स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करायचे त्यांनी ठरविले. काकांचे घर सोडल्यावर त्यांनी नागपूरमध्ये खोली पाहिली व त्या तेथे राहू लागल्या. धाकट्या बहिणी व भावालाही त्यांनी नागपूरला आणले. एक बहिण पदवीधर झाली. ती आयटीआयमध्ये क्लार्क आहे. दुसरी बचतगटाचे काम करते तर भाऊ पदवीधर होऊन छपाई व्यवसायात आहे. या तिघांचेही शिक्षण, विवाह कार्य शोभाताईंनी स्वत:च पूर्ण केले. दरम्यान वडिलांना पॅरालिसिस झाला. त्यांच्या 5 वर्षे आजारपणात त्यांनीच मनोभावे सर्व सेवा, सुश्रुषा केली, पण 2009 साली वडिलांचे निधन झाले. विवाहानंतर वर्षभरातच मुलगा झाला. मुलगा सारखा आजारीच असायचा. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला मेंदू विकार जडला. तो जगेल किंवा नाही अशी परिस्थिती होती. डॉक्टर म्हणायचे, जगला तरी तो मूकबधीर होईल. पण खचून न जाता सर्व उपचार मुंबईला येऊन केले. डॉ.रमाणी यांचे ऋण आजही त्या व्यक्त करतात. आज त्यांचा मुलगा गौरव संगणक अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. विवाहानंतर एका वर्षातच काकांचे निधन झाले. त्यांच्या सर्व मुलांचे संगोपनही शोभाताईंनीच केले. आज काकांचा एक मुलगा आर्किटेक्ट झाला, दुसरा पाण्याचा प्लँट पाहतो तर मुलीचे लग्न करुन दिले. इतकेच नव्हे तर तिचे कन्यादान सुद्धा केले. आजच्या मुलींना शिकण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे मुलींनी अधिकाधिक शिकले पाहिजे. पण त्याचबरोबर घरातील सर्व कामांच्या बाबतीत सुद्धा स्वावलंबी झाले पाहिजे, असे मनोगत त्या व्यक्त करतात. शोभा जयपूरकर यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! लेखक - देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) (वृत्त). स्त्रोत - महान्युज