गावाकडच्या गोष्टी ! फुंकर............. परवा,मी गावच्या यात्रेच्या निमित्ताने गावी गेलो होतो. यात्रौत्सवात संपूर्ण गाव माणसांनी फुलून गेला होता. या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही घरोघरी पाहुणे आलेले होते. त्यामुळे पाहुण्यांची घराघरात वर्दळ दिसत होती. गल्लीबोळातही मुलांचा गळका होता. रस्त्यात पिपांड्या वाजवीत मुले सारखी ये-जा करीत होती. दंगामस्ती करीत -करीत यात्रेचा आनंद मनमुराद लुटत, मुले आपापल्या घरी परतत होती. तर काही नुकतेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी बाजारात प्रवेश करीत होते. यंदाचा बाजार दरवर्षीच्या मानाने फुल्ल भरला होता आणि यंदा दुकाने जास्तच आली होती. वाणसामानाच्या दुकानांबरोबर खेळणी, गाठ्या, मनगट्या,भाजीपाला,फळे,मिठाईची दुकाने,खेळ साहित्य ई. दुकाने हारोभारी थाटली होती. हौसे, गौसे, नौसेंनी बाजारात गर्दी केली होती. मंदिरात तीन दिवस अखंड घंटानाद सुरु होता. विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. सर्वजण रांगेत उभं राहून दर्शनाचा लाभ घेत होते. देवाच्या चरणी लीन होऊन ते प्रार्थना करीत होते आणि प्रसन्न मुद्रेने बाहेर पडत होते. मागील वर्षी याच दिवशी केलेला नवस काहीजण फेडत होते. मुलांना केळी ,गुळाने जोखत होते. त्याचा प्रसाद करुन भाविकांना वाटत होते. मी दर्शन घेऊन बाजारातून फेरफटका मारून घरी जावे याच इराद्याने प्रचंड गर्दीत घुसलो. सगळीकडं यात्रेकरूंचा गलबला सुरू होता. दुकानदार, लहान मुलं, मोठी माणसे, बायका-पोरे यांचा गोंधळ..... हाका, आरोळ्या, तसेच विक्रेत्यांचा कानठळ्या बसतील असा आवाज ऐकून कान बसले होते. आई, वडिलांच्या हाताला, खांद्यावर, मागे, पुढे मुलं चालत होती. तरुण- टवार कंपनी एकमेकांना ढकळत,ओरडत, नेहमीप्रमाणेच शिव्या हासडत, पिपांडी वाजवत, दंगामस्ती करीत खऱ्या अर्थाने यात्रेचा आनंद लुटत होती. लहान मुलं रस्त्यात ,बाजारात दिसेल ते मागत होते. हट्ट धरत होते. काहींचे हट्ट पुर्ण होत होते तर काहींना दटावून आई-बाबा गप्प गार करीत होते. पण, मुलंच ती..... ऐकतील तर ती मुलं कसली? छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करून,बाजार करीत मी गर्दीतून पुढे सरकत होतो. तेवढ्यात, माझी नजर एका मिठाईच्या दुकानावर स्थिरावली. कलापूर्ण व कल्पकतेने मांडलेली ती मिठाई बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. मी मिठाई घेण्याच्या उद्देशाने तेथे थांबलो. तेथे एक चिमुरडं रडत होते . मिठाईकडे बोट दाखवून ती मागत होते. "आई, मला हे घे ना.... घे ना गं आई " " अरे हो, घेते ना.... तू गप्प बस.मी घेते हा सोन्या आईने ईकडे- तिकडे पाहिले. हळूच दुकानदाराला विचारले, "दादा, ही मिठाई कशी दिलीत? " "१२० रुपये पाव " "एकशे वीस???? " आश्चर्याने दोन्ही दातात जीभ चावत नकारार्थी मान हलवत ती पुढे निघाली. तोच त्या चिमुरड्याने भोकाड पसरले आणि हमसून- हमसून रडू लागला. तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते.ती हळूच आवाजात दुकानदाराला म्हणाली, "पोर रडतंय,दहाची द्या ना करुन" दुकानदार तिच्या अंगावर खेकसत म्हणाला, "जा पुढे, तिथे पाच रुपयांत मिळेल " त्याच्या त्या शब्दांने ती अर्धमेली होऊन मुलाच्या दोन धपाटे देऊन पुढे चालू लागली. ते अजुनच रडू लागले. "अरे, मुडद्या, चल पुढे, तुला घेऊन देते ना " असे म्हणत,त्याच्यावर खेकसत ती चालत राहिली व ते चिमुरडे ही रडत राहिले. हे सारं पाहून मला खूप वाईट वाटले. त्याक्षणी असे ही वाटले की, त्या चिमुरड्याला मिठाई घेऊन द्यावी. पण,एक विचार असाही यायचा की, तिने नाही घेतली तर? ..... मी थोडा शांत उभा राहिलो. मला खूप वाईट वाटले होते. मी मिठाई न घेताच घरच्या दिशेने तरातरा निघालो. दोन पावले उचलतो ना उचलतो तोच, माझ्या मनाने जोर खाल्ला. माझे मन माझ्याशी बोलू लागले की, 'अरे, घे मिठाई. दे त्या मुलाला बिनधास्त. ती बोलू दे बोलली तर... तुझा हेतू शुद्ध आहे. तेव्हा घे, तू आणि दे,त्या मुलाला.' मी तसाच मागे फिरलो. ते चिमुरडे मागत असलेल्या त्याच मिठाईचा पुडा मी घेतला. अन् पैसे देऊन त्या मातेला शोधू लागलो. प्रत्येक गल्लीत............ती माऊली कोणत्या रस्त्यातून गेली कुणास ठाऊक? कुठेच दिसत नव्हती. मी तिचा पाठलाग सुरू केला. पण,ती त्या गर्दीत मिसळून गुडूप झाली होती. तरीही, हिम्मत न हारता मी पुढे -पुढे चालू लागलो. बराच वेळ गर्दीतून वाट काढत, धक्का बुक्के सहन करीत, अर्धा तास बाजारात फिरत राहिलो. तितक्यात,मला ती दिसली. एका घराच्या वळचणीला कुडाच्या भिताडाला टेकून ती दोघं माय- लेकं त्या शांत सावलीत विसावली होती. मी हिम्मत करून पुढे गेलो. त्या माय लेकांच्या दिशेने. त्या माऊलीचा चेहरा काळवंडलेला दिसत होता. तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू ओघळू लागले होते. तिची ती अगतिकता तिला सारखी सतावत होती. तिची गरीबी तिला शाप वाटत होती. माझी नजर त्या चिमुरड्याकडे गेली. ते रडून -रडून थकले होते व शांत झोपी गेले होते. त्या बालहट्टाचा आज गरिबीमुळे पराभव झाला होता. पराजित होऊन ते निपचित पडले होते. मी त्याच्याकडे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करीत माझे ओलावलेले डोळे पुशीत त्या माऊलीला हाक मारली. ती जराशी दचकून माझ्याकडे पाहू लागली. मी हात पुढे करीत म्हणालो, "ताई, हा घ्या पुडा बाळाला." "हे का? कशासाठी? कोण तुम्ही? मी नाही ओळखले तुम्हाला. "ओशाळलेल्या नजरेनेच माझ्याकडे जरा वक्र कटाक्ष टाकून ती म्हणाली. "मी पण, नाही ओळखले तुम्हाला. पण, बाळाला हवी होती मिठाई.ही घ्या. " तिने संकुचल्यागतच पुडा हातात घेऊन माझा सन्मान केल्यागत मला त्याक्षणी वाटले. तिच्या चेहऱ्यावरचा तो भाव, तिच्या डोळ्यात न मावणारी उपकाराची भावना मी अनुभवत होतो. विठ्ठलाच्या दर्शनाने झालेल्या आनंदापेक्षा हा आनंद निराळा होता. जो फक्त १२०रुपये मोजून मिळाला होता. तो आनंद आणि तो क्षण मी अजुनही पुरवला आहे! हे लिहितांनाही माझे डोळे पाणावले आहेत......काय सांगू तुम्हाला???? प्रा. गोपाळ हरी वेखंडे, शहापूर, जी. ठाणे