वैदिक गणित – गणित शिकण्याची सोपी, जलद आणि प्रभावी पद्धत गणित हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दैनंदिन व्यवहारापासून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये गणिताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तरीही अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण वाटतो. याचे मुख्य कारण म्हणजे लांब पद्धती, जास्त वेळ लागणारी गणिते आणि आत्मविश्वासाचा अभाव. अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणित ही एक प्रभावी, सोपी आणि आनंददायी पद्धत ठरते. वैदिक गणित ही गणित सोडविण्याची एक जलद आणि तर्कशुद्ध पद्धत आहे. या पद्धतीमध्ये विविध गणिती क्रिया कमी वेळात आणि कमी टप्प्यांत सोडवण्यासाठी विशेष सूत्रे आणि युक्त्यांचा वापर केला जातो. वैदिक गणिताची मांडणी जगद्गुरू स्वामी भारती कृष्ण तीर्थजी यांनी केली. त्यांनी प्राचीन भारतीय गणितीय परंपरेचा अभ्यास करून १६ मुख्य सूत्रे आणि १३ उपसूत्रांच्या आधारे ही पद्धत विकसित केली. आज वैदिक गणिताचा अभ्यास भारतासह अनेक देशांमध्ये केला जात असून, त्याचा उपयोग शालेय शिक्षणापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत मोठ्या प्रमाणावर होत आहे. वैदिक गणिताचे वैशिष्ट्य म्हणजे गणितातील अवघड वाटणाऱ्या क्रियाही सहज आणि मानसिक पद्धतीने करता येतात. उदाहरणार्थ, ११ ने गुणाकार करताना दोन अंकांच्या संख्येच्या मधील अंकांची बेरीज करून उत्तर काही सेकंदांत मिळते. तसेच ५ ने संपणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची सोपी युक्ती विद्यार्थ्यांना गणिताविषयी आकर्षित करते. अशा अनेक पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो आणि गणित सोडविण्याचा आत्मविश्वास वाढतो. वैदिक गणितामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक गणनेची सवय निर्माण होते. सतत कॅल्क्युलेटरवर अवलंबून न राहता विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अचूक गणना करू लागतात. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित होते. नियमित सरावामुळे गणितातील अचूकता वाढते आणि चुका कमी होतात. विशेषतः शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जलद गणना करण्यासाठी वैदिक गणित अत्यंत उपयुक्त ठरते. शाळांमध्ये वैदिक गणिताचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचा गणिताविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. शिक्षक विविध कृती, खेळ, चित्रे आणि उदाहरणांच्या माध्यमातून वैदिक गणित शिकवू शकतात. त्यामुळे वर्गातील वातावरण आनंददायी बनते आणि विद्यार्थी उत्साहाने गणित शिकू लागतात. गणित ही केवळ आकडेमोड नसून विचार करण्याची प्रक्रिया आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. आजच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल आणि कॅल्क्युलेटर सहज उपलब्ध असले तरी मानसिक गणनेचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. उलट, जलद विचार करण्याची क्षमता, समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि अचूक निर्णय घेण्याची सवय विकसित करण्यासाठी वैदिक गणित अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित सराव करून या पद्धतींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शेवटी असे म्हणता येईल की, वैदिक गणित ही भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेची एक अमूल्य देणगी आहे. ही पद्धत विद्यार्थ्यांना गणित सोपे, जलद आणि आनंददायी बनवते. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि वैदिक गणितातील सूत्रांचा योग्य वापर केल्यास प्रत्येक विद्यार्थी गणितात प्रावीण्य मिळवू शकतो. त्यामुळे शालेय शिक्षणात वैदिक गणिताचा अधिकाधिक समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचारशक्ती विकसित करणे ही काळाची गरज आहे. श्री सुनील विठोबा वेळेकर शिक्षक, स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार तालुका रामटेक जिल्हा नागपूर